मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेचे कर्मचारी, पालिकेचे शिक्षक, बेस्ट कर्मचारी, आरोग्य सेविका यांना बोनस जाहीर केला आहे. आरोग्य सेविकांना एक महिन्याचा पूर्ण पगार तर इतरांना 22 हजार 500 रुपये बोनसची घोषणा केली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची आता दिवाळी गोड होणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबई महापालिकेचे 93 हजार आणि बेस्टचे 29 हजार कर्मचाऱ्यांसह, शिक्षक, आरोग्य सेविका यांना दिवाळी बोनस मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे गुरुवारी बोनससंदर्भात बैठक झाली. या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्र्विनी भिडे, माजी आमदार किरण पावसकर, महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आदी तसेच संदीप देशपांडे, शशांक राव, संतोष धुरी, उत्तम गाडे, अशोक जाधव यांच्यासह पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आनंदात दिवाळी साजरी करा. मुंबई महापालिकेशी निगडीत विकास कामांतील तसेच कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी या प्राधान्याने सोडविल्या जातील. सगळ्यांनी आता मुंबईकरांसाठी मनापासून काम केले पाहिजे. रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामे नागरिकांच्या मनासारखी दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी अभियंत्यांपासून ते सर्वांनीच दक्षता घ्यावी.