मुंबई कॉंग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर…

उर्मिला मातोंडकरच्या राजीनाम्यास युवक कॉंग्रेसचा पाठींबा

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कॉंग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. या गटबाजीला कंटाळून लोकसभेसाठी कॉंग्रेसच्या उमेदवार असलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी नुकताच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे मातोंडकर आता कॉंग्रेसमध्ये नसल्या तरी युवक कॉंग्रेस त्यांच्या पाठीशी असल्याचे महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेसचे युवा नेतृत्व असलेल्या उर्मिला मातोंडकर या विचारधारेशी एकनिष्ठ असेलल्या व्यक्ती आहेत. थोड्या काळासाठीच आम्ही त्यांच्यासोबत काम केले मात्र, या काळात त्यांच्या वागण्या-बोलण्यातून त्यांच्या विचारातील स्पष्टता आम्हाला जाणवत होती. तसेच त्यांनी कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देताना आपण कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचे सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केले आहे. यातून त्यांची वैचारिक एकनिष्ठता प्रतित होते. राजकीय व्यक्ती नसल्याने त्यांना पक्षातील गटबाजी सहन झाली नाही आणि त्यांनी राजीनामा दिला, असे सांगताना तांबे यांनी देखील कॉंग्रेसमधील गटबाजीवर बोट ठेवले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी युवक कॉंग्रेसने पक्षश्रेष्ठींकडे 60 जागांची मागणी केल्याचे तांबे यांनी सांगितले आहे. आमच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महत्वाची पदं भुषवलेले सक्षम नेते आहेत. त्यामुळे त्यांना यावेळी संधी देण्याची मागणी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी तांबे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच्या आघाडीबाबतही महत्वपूर्ण भाष्य केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.