मुंबई – मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेली लढत चांगलीच वादळी ठरली. या सामन्यात केकेआरचा कर्णधार नितीश राणा आणि हृतिक शोकीन यांच्यात जोरदार वाद झाला. त्याचवेळी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या सूर्यकुमार यादवलाही 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
“मुंबई इंडियन्सचा आयपीएल आचारसंहितेचा पहिला गुन्हा असल्याने कर्णधार सूर्यकुमार यादवला स्लो ओव्हर रेटच्या गुन्ह्यासाठी 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता मॅच जिंकूनही मुंबईच्या कर्णधाराची स्लो ओव्हर्समुळे डोकेदुखी वाढणार आहे.
नितीश-शौकीनवरही मोठा दंड
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाला आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. नितीशने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.21 अंतर्गत लेव्हल 1 ची चूक मान्य केली आहे.
तर दुसरीकडे आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मुंबई इंडियन्सचा गोलंदाज हृतिक शोकीनला त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. शोकीनने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.25 अंतर्गत नियमाचे उल्लंघन केले. आयपीएलमध्ये आचारसंहितेचे लेव्हल 1 चे उल्लंघन झाल्यास, मॅच रेफरीचा निर्णय निर्णायक मानला जातो.
वाद काय होता
विशेष म्हणजे नितीश राणा हृतिक शोकीनच्या चेंडूवर झेलबाद झाला. आऊट झाल्यानंतर नितीश राणा आणि हृतिक शोकीन यांच्यात वाद झाला. राणाला बाहेर काढल्यावर शोकीन त्याला काहीतरी म्हणाला. हे पाहून केकेआरचा कर्णधार भडकला आणि त्यानेही परतताना गोलंदाजाला काहीतरी म्हंटले.या आधीही या दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली होती.
मुंबई विरुद्ध केकेआर मॅचमध्ये काय झालं
आयपीएल 2023 च्या 22 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 20 षटकात 185 धावा केल्या. त्याच वेळी, मुंबईने हे लक्ष्य 17.4 षटकांत सहज गाठले. मुंबई इंडियन्सने हा सामना 14 चेंडू बाकी असताना 5 गडी राखून जिंकला