मुंबई- मुंबईतील ग्रॅंट रोड येथील ड्रीमलॅंड सिनेमाजवळ असलेल्या आदित्य ऍक्रेड या निवासी इमारतीला रविवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. यात अग्निशमन दलाच्या एका जवानासह पाच जण जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवान घटनास्थळी दाखल झाले. इमारतीत अनेक जण अडकले होते, त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
मुंबईतील ग्रॅंट रोड येथे ड्रीमलॅंड सिनेमाजवळ असलेल्या आदित्य ऍक्रेड इमारतीला रविवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास पहिल्या मजल्यावर भीषण आग लागली. आगीची माहिती कळाल्यानंतर अग्निशमन दलाचे 15 बंब, 10 जंम्बो टॅंकर आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, इमारतीमध्ये अनेक रहिवासी अडकले होते. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सुखरुप बाहेर काढले. या आगीत 4 जण जखमी झाले असून मदत कार्य करताना अग्निशम दलातील एक कर्मचारीही जखमी झाला. या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील तीन जणांना जेजे रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र, आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकले नाही.
आग लागलेल्या इमारतीत सात ते आठ नागरिक अडकले होते. काही वेळाने अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य हाती घेत क्रेन आणि शिडीच्या मदतीने इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती आहे.