बहुगुणी गार्लिक ऑईल

डॉ. शीतल जोशी

औषधी म्हणून लसणाचा वापर करण्याची पद्धत फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. किंबहुना चीन, ग्रीस, रोम आणि इजिप्तमधील प्राचीन वैद्यकशास्त्रावर आधारित ग्रंथांमध्येही लसूण अनेक तऱ्हेच्या विकारांवर औषधी म्हणून वापरले जात असल्याचे उल्लेख आहेत. आयुर्वेदामध्येही लसणाच्या सेवनाने आरोग्याला अनेक प्रकारे लाभ होत असल्याचे म्हटले आहे. ज्याप्रमाणे लसणाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते, हृदयाचे आरोग्य चांगले राहते, त्याचप्रमाणे लसणाचा वापर करून तयार केलेले गार्लिक ऑईल केसांच्या आरोग्यासाठी उत्तम समजले जाते.

गार्लिक ऑईल, म्हणजेच लसूण मिश्रित तेलामध्ये सल्फर मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे केसांची मुळे बळकट होऊन केसांची लांबी झपाट्याने वाढते. कच्च्या लसणामध्ये अनेक जीवनसत्वे आणि क्षार असतात. यामध्ये क जीवनसत्व मुबलक प्रमाणात असून, त्यामुळे केसांच्या वाढीसाठी आवश्‍यक असलेले कोलाजेन वाढते. लसणातील रासायनिक तत्त्वांनी केसांच्या मुळांशी रक्ताभिसरण वाढत असून, यातील कॅल्शियम आणि सेलेनियममुळे केस गळती कमी होऊन केसांची उत्तम वाढ होते. गार्लिक ऑईलच्या वापराने केसांमधील कोंडा नाहीसा होण्यास मदत होते, यामध्ये असलेले ऍलिसिन हे तत्त्व केसांतील कोंडा नाहीसा करणारे आहे.

गार्लिक ऑईल घरच्या घरी तयार करता येऊ शकते. यासाठी एक मोठा चमचा लसूण पेस्ट घेऊन ती एका भांड्यामध्ये गरम करून घ्यावी. लसणाची पेस्ट बाजारातून तयार न आणता ताजा लसूण ठेचून बनविली जावी. लसूण पेस्ट थोडी गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक कप खोबरेल तेल घालावे. हे लसूण मिश्रित तेल थोडेसे रंग बदलेपर्यंत तापू द्यावे. तेलाचा रंग हलका भुरा झाला, की तेल आचेवरून बाजूला करून थंड होऊ द्यावे. थंड झाल्यानंतर हे तेल गाळून घेऊन बाटलीमध्ये भरून ठेवावे. आठवड्यातून दोन वेळा हे तेल हलके कोमट करून त्याने केसांच्या मुळांशी मसाज करावा. रात्रभर हे तेल केसांवर ठेवणे शक्‍य नसेल, तर हे तेल किमान दोन तास केसांवर राहू द्यावे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)