अभिवादन: बहुआयामी पु. ल.

अमेय गुप्ते 

प्रतिभावंत मराठी साहित्यिक
कै. पु. ल. देशपांडे यांची आज (08 नोव्हेंबर) जन्मशताब्दी! त्यानिमित्त त्यांच्या बहुआयामी व्यक्‍तिमत्त्वाचा घेतलेला आढावा.

मराठी साहित्य, संगीत, चित्रपट, नाटक, अशा अनेक क्षेत्रांत आपल्या लीलया लेखणीने स्वतंत्र ठसा उमटवणारे बहुरंगी-बहुढंगी व बहुआयामी व्यक्‍तिमत्त्व म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके पु. ल.! मुंबईतील गावदेवी भागातील डॅनवॉलीस या चाळीत शनिवार दिनांक 08 नोव्हेंबर 1919 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील लक्ष्मण त्र्यंबक देशपांडे हे त्याकाळी एका पेपरमिलमध्ये नोकरी करीत, त्यांना नाट्यसंगीताची आवड होती. तर पु. लं.च्या मातोश्री लक्ष्मीबाई या सुसंस्कृत, गृहकृत्यदक्ष होत्या. त्यांचे वडील वामन मंगेश दुभाषी हे त्याकाळी नावाजलेले लेखक होते.

पु. लं.चे बालपण मुंबईतील विलेपार्ले भागात गेले. तेथील पार्ले टिळक विद्यालयातून सन 1935 मध्ये मॅट्रिकची परीक्षा चांगल्याप्रकारे उतीर्ण होऊन त्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण इस्माईल युसुफ महाविद्यालय, पुणे येथील फर्गसन महाविद्यालय, सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालय येथे झाले.
मुंबईतील दादर भागातील ओरिएंट हायस्कूल (आताची दादर विद्या मंदिर) या शाळेत पु. लं. शिक्षक म्हणून लागले. या शाळेत त्या वेळेस बाळासाहेब ठाकरे व त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे हे त्यांच्या वर्गात शिकत होते. त्याच शाळेत सुनीता सदानंद ठाकूर या शिक्षिका होत्या. वर्षभरात दोघांचे मैत्रीत रूपांतर झाले व 12 जून 1946 रोजी दोघेही नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झाले. विवाहानंतर त्या सुनीता पुरुषोत्तम देशपांडे झाल्या. पु. लं.नी काही काळ दादर येथील कीर्ती महाविद्यालय, मालेगाव येथील महात्मा गांधी विद्यालय व बेळगाव येथील राणी पार्वतीदेवी महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून नोकरी केली.

त्यांचे हार्मोनियम वादनाचे शिक्षण दत्तोपंत राजोपाध्ये यांच्या भास्कर संगीतालय येथे झाल्याने त्यांनी या वादनावर उत्तम प्रभुत्व मिळवले. अनेक ठिकाणी त्यांचे हार्मोनियम सोलोचे कार्यक्रम होत असत. त्यामुळे उत्तम संगीतकार म्हणूनही त्यांनी नावलौकिक मिळवला. मुंबई आकाशवाणी येथे ते कार्यरत असताना कवी मंगेश पाडगावकर यांच्या बिल्हण या संगीतिकेला त्यांनी स्वरसाज चढवून ते सप्तसुरांचे जणू शिलेदारच झाले. या संगीतिकेतील माझे जीव गाणे व शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले ही गीते त्यांनी अजरामर केली.

पु. लं. हे विनोदाचे बादशहा असून त्यांचे विनोद कोटीबाज असायचे. बहारीन देशाच्या विमानतळावरील चहाचे वर्णन करताना ते म्हणायचे, चहाच्या चवीवरून त्यात खाजुरीचे पान वाळवून त्याची पत्ती वापरीत असावेत आणि दूध तर नक्‍कीच उंटिणीचे असावे. या चहानंतर मी मंजीष्टेचा काडादेखील आनंदाने व चवीने प्यालो असतो. यात फक्‍त आनंदाची एकच बाब म्हणजे हा चहा फुकट मिळाला होता. पोस्टाविषयी बोलताना ते एकदा म्हणाले, एका पत्राची डिलिव्हरी उशिरा दिल्याबद्दल एक माणूस पोस्टमास्तरांकडे तक्रार करण्यासाठी गेला.त्या माणसाचे सर्व म्हणणे त्यांनी ऐकून घेऊन पोस्टमास्तर म्हणाले, अहो, डिलिव्हरी म्हटली की, चार दिवस अलीकडे, पलीकडे व्हायचंच. नवव्या महिन्याची दहाव्या महिन्यात होते, देव चुकतो, तेथे माणसाचं काय? यावर पोस्टात जमलेल्या सर्वांनी हास्याचे कारंजे उडवले.

सन 1947 मध्ये त्यांनी कुबेर या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात त्यांनी उत्तम अभिनय साकारला तसेच पार्श्‍वगायक म्हणून गीते साकारली. तर 1953 मध्ये साकारलेला गुळाचा गणपती हा मराठी चित्रपट लोकप्रिय ठरला. या चित्रपटातील इंद्रायणी काठी देवाची आळंदी हे गीत म्हणजे जणू इंद्रायणीच्या पवित्र जलाने ज्ञानदेवांच्या समाधीला जणू घातलेला अभिषेकच! गदिमांची सिद्धहस्त लेखणी, भीमसेन जोशींचा पहाडी आवाज व पु.लं.चे संगीत म्हणजे जणू साहित्याच्या गंगेतील त्रिवेणी संगमच! तर देवबाप्पा या चित्रपटातील आजही अबालवृद्धांच्या अगदी ओठावर असणारे गीत म्हणजे नाच रे मोरा, आंब्याच्या वनात!

नाट्यक्षेत्रात पु. लं. तेवढ्याच दिमाखाने वावरले. बालकवी ठोमरे यांनी फुलराणीला निसर्गाचे लेणे लेऊन सजवले, तर पु. लं.नी त्या फुलराणीला रंगभूमीवर साकारले. त्यांचे साहित्य म्हणजे साहित्याच्या गगनात लावलेले जणू नक्षत्रांचे दिवेच! 3 एकपात्री नाटके, 11 सामाजिक नाटके, 2 बालनाट्ये, 14 विनोदी पुस्तके, 4 प्रवासवर्णने, 3 कादंबऱ्या, 1 चरित्र, 6 विनोदी व्यक्‍तिचरित्रात्मक पुस्तके, 21 विनोदी निबंध, 4 एकपात्री अभिनय असलेली नाटके आणि अभिनय, दिग्दर्शन, संगीत दिलेले, पटकथा लिहिलेले एकूण 25 चित्रपट असा सर्वच क्षेत्रात उंचावलेला त्यांचा आलेख या महाराष्ट्राला ललामभूत ठरला आहे. त्यांना अनेक पुरस्कार-मानसन्मान लाभले, अनेकांनी त्यांचा गौरव केला. त्यांचे पुण्यात कमला नेहरू पार्कच्या जवळ असलेल्या 777/1 रुपाली या इमारतीत अनेक वर्षे, मालती-माधव, 819 भांडारकर रस्ता, पुणे येथे काही वर्षे, तर मुंबईत 05, त्र्यंबक सदन, अजमल रोड, विलेपार्ले येथेही वास्तव्य होते.

12 जून 2000चा तो दिवस! योगायोगाने त्यांच्या लग्नाचा 54 वा वाढदिवस! त्या दिवशी साहित्याच्या अफाट गगनात अढळ झालेला पुलकित तारा निखळला. त्या दिवशी साऱ्या महाराष्ट्रातून, साहित्याच्या गगनातून अश्रूंची जणू सरिता वाहिली, पण आजच काय कितीही शतके लोटली तरी त्यांची स्मृती चिरकाल टिकून, येणाऱ्या पुढील पिढीला त्यांच्या साहित्याचा आनंद देईल यात शंका नाही. अशा या साहित्य गगनातील पुलकित ताऱ्याला जन्मशताब्दीनिमित्त त्रिवार वंदन!

Leave A Reply

Your email address will not be published.