ब्रॅंड ऑडिटच्या पाचव्या आवृत्तीमध्ये पुणे शहरात बालाजी वेफर्स, पारले, मोंडेलेज, ब्रिटानिया व बिसलेरी हे सर्वाधिक प्लॅस्टिक प्रदूषण करणारे ब्रॅंड्स आढळून आले आहेत. कोका कोला, पेप्सिको, नेस्ले, युनिलीव्हर व मोंडेलेज हे ब्रॅंड्स सलग पाचव्या वर्षी जागतिक प्लॅस्टिक प्रदूषक ठरले आहेत. प्रदूषक कंपन्यांना त्यांच्या निष्क्रियतेसाठी ‘ट्रॅशिवर्सरी’ (Trashiversary) द्वारे जगभरातील कार्यकर्ते कंपन्यांचा कचरा त्यांना पाठवणार आहेत व या कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्वरित कृती करण्यासाठी आवाहन करणार आहेत.
ब्रेक फ्री फ्रॉम प्लॅस्टिक या आंतरराष्ट्रीय संस्थेने राबविलेला ब्रॅंड ऑडिट हा जागतिक स्तरावरील उपक्रम आहे; ज्यात परिक्षणाद्वारे प्लॅस्टिक प्रदूषणास जबाबदार असलेल्या कंपन्यांना शोधून त्यांनी त्याची जबाबदारी घेण्यासाठी प्रवृत्त केले जाते. कष्टकरी पंचायत, स्वच्छ संस्था व विरीदे या स्वयंसेवी संस्थेने पुण्यातील एआरएआय टेकडीवर स्वच्छता मोहीम व ब्रॅंड ऑडिट राबवले.
त्यामध्ये ८९% खाद्यपदार्थ आवरणे (Food packaging) व ७१% मल्टीलेयर प्लॅस्टिकचा कचरा (रिसायकल न करता येण्यासारखा कचरा) आढळून आला. प्लॅस्टिक प्रदूषणावर काम करताना दररोज २०० टन कचरा लँडफिलला जाण्यापासून रोखून रिसायकलिंगसाठी पाठवणारे स्वच्छ संस्थेचे कचरावेचक, पर्यायी व योग्य उपक्रम राबवत आहेत. ‘कमिट टु झिरो’ या शून्य कचरा उपक्रमांतर्गत, रिसायकल न करता येणारे प्लॅस्टिक कमी करण्यासाठी सोसायटयांमध्ये रिफिलेबल सारखे उपक्रम राबवत आहेत.
लुबना अनंतक्रिष्णन (कष्टकरी पंचायत) म्हणाल्या, “नागरिक व महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन सुविधांवर जबाबदारी टाकण्याऐवजी, सर्व उत्पादक कंपन्यांनी ‘एक्स्टेंडेड प्रोड्यूसर रिस्पॉन्सीबीलिटी’ (ईआरपी) अंतर्गत उत्पादन हाताळणी व त्याच्या पॅकेजिंगची जबाबदारी घेणे अपेक्षित आहे. आणि तरीही या व्यवस्थेमुळे असंघटित रिसायकलिंग क्षेत्राला धक्का पोहोचतो.
भारतामध्ये चांगले रिसायकलिंग होत असतानादेखील, रिसायकलिंग क्षेत्र असंघटित आहे आणि त्यामुळे हे घटक ईआरपी मध्ये सहजासहजी सामावून घेतले जाणार नाहीत. कंपन्यांनी कचऱ्याची जबाबदारी घेऊन त्यासोबत रिसायकलिंग क्षेत्रातील मनुष्यबळाची उपजीविका देखील जपली पाहिजे. स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थेने आयटीसी कंपनी सोबत काम केले आहे; ज्यामध्ये मल्टीलेयर प्लॅस्टिक चे संकलन व रिसायकलिंगची व्यवस्था बसवण्यात आली आहे. ईआरपी अंतर्गत प्लॅस्टिक कचरा हाताळणीसोबत असंघटित कामगारांचे अशा पद्धतीने एकत्रीकरण करता येते याचे हे उत्तम उदाहरण आहे. ”
सुमन मोरे, अध्यक्ष, स्वच्छ यांनी सांगितले, “प्लॅस्टिक प्रदूषणावर सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. आम्ही कंपन्यांना आवाहन करतो की प्लॅस्टिक कचरा हाताळणी व रिसायकलिंगसाठी त्यांनी कचरावेचकांसोबत काम करावे. ”
ब्रेक फ्री फ्रॉम प्लॅस्टिक’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने ‘ब्रॅंड ऑडिट’च्या पाचव्या आवृत्तीत जागतिक प्लॅस्टिक प्रदूषक जाहीर केले. प्लॅस्टिक प्रदूषक कंपन्यांना शोधण्यासाठी, २०१८ पासून ८७ देशांमध्ये २ लाख स्वयंसेवकांनी ब्रॅंड ऑडिट उपक्रम राबविले.