पिरंगुट, (वार्ताहर) – लोकसभा निवडणुकीत मुळशी तालुक्यात तुतारीचा बोलबाला असल्याचे स्पष्ट झाले. मुळशीत तालुक्यातून सुप्रिया सुळे यांना १००६७ असे अधिकचे मताधिक्य मिळाले. मुळशी तालुक्यातून सुप्रिया सुळे यांना ५३,९७१ एवढी तर सुनेत्रा पवार यांना ४३,९०४ एवढी मते मिळाली.
राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांची फौज अजित पवार यांच्या पाठिशी उभी होती. परंतू या नेत्यांना आपल्याच गावात सुनेत्रा पवार यांना आघाडी देण्यात सपशेल अपयश आले. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे पक्ष आणि कॉंग्रेसने पाळलेला आघाडी धर्म यामुळे सर्व सामान्य मतदारांनी सुप्रिया सुळे यांना साथ दिली.
सलग चौथ्यांदा बारामती लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून जाण्याचा बहुमान मिळवत सुप्रिया सुळे यांनी गड राखला आहे. तब्बल दीड लाख मतांनी विजयी झाल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आनंद द्विगुणित झाल्याचे पहायला मिळाले. गावनिहाय कोणत्या उमेदवाराला किती मतांचे लीड आहे, याची उत्सुकता लागून राहिली होती. त्यानुसार बहुतांश गावात तुतारीच वाजली असल्याचे पाहायला मिळाले.
मुळशी तालुक्यातून एकूण १ लाख ६ हजार १२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना ४३ हजार ६३२ मतं तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना ५३ हजार ५७३ मतं मिळाली.
मुळशीच्या पूर्व भागातील मोठ्या गावात सुप्रिया सुळे या आघाडीवर राहिल्या. सुप्रिया सुळे यांना भुगाव मधून ६१०, भुकुममधून १९८, पिरंगुटमधून ४१६, कासारआंबोलीतून १८४, अंबडवेटमधून ४७६, लवळे येथून ३२५, घोटवडेतून ६८४, चांदेतून २९१, मुलखेडमधून ४५ मताधिक्य मिळाले. सुसमधून सुनेत्रा पवार यांना १४५३ मतांची तर बावधनमधून १४५२ आघाडी मिळाली.
मुळशी तालुक्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद, जिल्हा दूध संघाचे दोन संचालक, जिल्हा नियोजन समितीचे तीन सदस्य, भाजपाचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच आजी माजी मोठ्या पदावरील राजकीय नेते होते. शिवाय अजित पवार गटाचे शेजारच्या तालुक्यातील आमदार यांनी मुळशीत प्रचाराचा मोठा धडाका लावला होता. राष्ट्रवादी (अजित पवार गट), भाजप, शिवसेना (शिंदे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आरपीआय तसेच इतर घटक पक्ष सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय होते.
मुठा खोऱ्यात तुतारीचा नाद घुमला
मुठा खोऱ्यातही तुतारीचा नाद घुमल्याच चित्र स्पष्ट झाले. या खोऱ्यातील अनेक गावांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे या भागातून कोण लीड घेणार याची उत्सुकता होती. त्यानुसार सुनेत्रा पवार यांना २२६८ मते मिळाली. तर सुप्रिया सुळे यांना ४५८९ मते मिळाली. सुप्रिया सुळे यांना या भागातून २३२१ मते मिळाली. तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे यांच्या कोंढूर गावात पवार यांना ३२ तर सुळे यांना ६२७ मते मिळाली.