मुळशी, हवेली आणि खेड तहसीलदार यांच्या बदलीची चर्चा

जिल्हा प्रशासनात आता तहसिलदार, उपजिल्हाधिकारी यांच्या बदलीचे वारे वाहू लागले आहेत. प्रामुख्याने हवेली, मुळशी आणि खेड तहसिलदार या तीन तहसिलदार यांच्या बदलीची चर्चा सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु आहे. स्थानिक आमदारांनी तहसिलदार यांच्या कामकाजासंदर्भात व्यक्त केलेली नाराजी तसेच नागरिकांच्या तक्रारी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे या बदल्यांची चर्चा सुरु आहे. यापार्श्‍वभूमीवर जे तहसिलदार बदलीच्या प्रतिक्षेत आहेत, त्यांनी पालकमंत्री पवार यांना बदली थांबविण्यासाठी विनंती केल्याचे समजते. तर काही अधिकाऱ्यांनी तासनतास थांबून आमदारांची मनधरणी केल्याचे समजते. त्यामुळे यावर काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.

मागील अनेक दिवसांपासून तहसिलदारांच्या बदलीची चर्चा सुरु आहे. मात्र या ना त्या कारणामुळे त्या लांबणीवर गेल्या आहेत. जिल्ह्यात रिक्त असलेली अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि काही उपजिल्हाधिकारी दर्जाचे पदांवर नियुक्ता करण्यात आल्या आहेत. मात्र तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश अजूनही निघाले नाहीत. या बदलीच्या आदेशांवर मुख्यमंत्र्यांची सही होणार असल्याने बदलीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

तर या बदलीच्या ठिकाणी आपली नियुक्ती व्हावी, यासाठी काही अधिकाऱ्यांनी सेटिंग लावली आहे. संबधित लोकप्रतिनिधींची शिफारस पत्रे सुध्दा घेतली असल्याचे समजते. तर बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांनी आपली बदली रोखण्यासाठी वेळप्रसंगी मॅट मध्ये जाण्याची तयारी दर्शविली असल्याचे समजते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.