मुळशीत बचत गटातील महिलांची साडेसोळा लाखांची फसवणूक

पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पिरंगुट (पुणे) – माले (ता. मुळशी) येथे सियाराम महिला बचत गटातील 46 महिलांची 16 लाख 56 हजार रूपयांची फसवणूक झाली आहे. सविता भोलेनाथ घाग आणि स्वाती शिवाजी कदम (दोघीही रा. माले, ता. मुळशी, जि. पुणे ) यांच्या विरूद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अर्चना चंद्रकांत शेंडे (वय 35, रा. माले) यांनी फिर्याद दिली.

याबाबत माहिती अशी की, 25 जानेवारी 2017 रोजी सविता घाग व स्वाती कदम यांनी आसपासच्या इतर 48 महिला जमवून एकूण 50 महिलांचा बचत गट सुरू केला होता. या बचत गटाच्या अध्यक्षा म्हणून सविता घाग तर सचिव म्हणून स्वाती कदम कामकाज पाहायच्या. बचत गटातील 48 महिला दरमहा एक हजार रूपये या दोघीकडे जमा करीत. या सर्व महिलांनी घाग व कदम यांना बॅंकेत खाते उघडायला सांगितले; परंतु आज किंवा उद्या उघडू असे सांगत त्या दोघींनी खाते उघडले नाही. या बचत गटामध्ये सविता घाग यांचेच स्वतः चे तीन नंबर होते. या दोघींनी गेल्या तीन वर्षात 46 महिलांची 16 लाख 50 हजारांची फसवणूक केलेली आहे.

बचत गटातील महिला या दोघींना वारंवार पैशांची मागणी करत आहेत; मात्र त्या दोघींनी या सर्व महिलांना पैसे परत केले नाही. अखेर पौड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रार देण्यासाठी बचत गटातील सर्व महिला पौड पोलीस ठाण्यात दिवसभर ठाण मांडून बसल्या होत्या.

  • पोलिसांनीही फिरवले…
    या प्रकरणाची माहिती पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी घेतली व गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या; मात्र या भागातील हवालदार मंगेश लांडगे यांनी या 46 महिलांना गेली तीन ते चार महिने उडवाउडवीची उत्तरे देत गुन्हा दाखल करून काय पैसे मिळणार आहेत का? असे सांगितले. लॉकडाऊन काळात या सर्व महिलांना लांडगे यांनी पौड पोलीस ठाण्यात बोलावून दिवसभर बसवून परत घरी जायला लावले. या महिलांनी काबाडकष्ट करून गुंतविलेले आपलेच पैसे वसूल करण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.