मुलायमसिंह यादव यांच्या सुनेला योगी सरकारकडून विशेष सुरक्षा; निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या

 

लखनौ – समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्या कनिष्ट सुनबाई अर्पणा यादव यांना उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने विशेष सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. योगी सरकारच्या मागच्या महिन्यात घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुलायमसिंह यादव यांचे कनिष्ट पुत्र प्रतीक यादव यांच्या अपर्णा यादव या पत्नी आहेत. त्यांना भाजप सरकारकडून वाय

कॅटेगरीची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सन 2022 च्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांना भाजपची उमेदवारी देण्याची तयारी भाजप सरकारने चालवली आहे, अशी शंका उपस्थित केली जात आहे. खुद्द माजी मुख्यमंत्री व त्यांचे मेव्हणे अखिलेश यादव यांनीच या घडामोडीवर शंका उपस्थित केली आहे. काहींतरी वेगळं शिजतं आहे असे त्यांनी म्हटले आहे. यात भाजपची राजकीय चाल आहे हे पाचशे टक्‍के खरे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

या संबंधात पीटीआयशी बोलताना अपर्णा यादव यांनी सांगितले की, आपण नेताजींच्या सांगण्यावरून सन 2016 मध्ये समाजवादी पक्षाची सदस्यता स्वीकारली आणि आजही आपण याच पक्षात आहोत. पण हे सांगताना त्यांनी समाजवादी पक्षाच्या सध्याच्या कारभारावर टीकाही केली. समाजवादी पक्षात शिस्त राहिली नाही, असे त्या म्हणाल्या. नेताजींनी (मुलायमसिंह) नेहमी समाजवादी तत्त्वांचा पुरस्कार केला पण आज पक्षात या तत्त्वानांच तिलांजली दिली गेली आहे, पक्षात महिलांना मानाचे स्थान राहिले नाही, असेही त्यांनी नमूद करीत आपला रोख स्पष्ट केला आहे.

करोना रोगाच्या नियंत्रणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांचेही अपर्णा यादव यांनी समर्थन केले. देशात लॉकडाऊन जाहींर केल्याबद्दल संपूर्ण जगाने मोदींचे कौतुक केले आहे, असे त्या म्हणाल्या. करोनाच्या काळात योगी आदित्यनाथ

यांनी केलेल्या कार्याचेही त्यांनी या मुलाखतीत कौतुक केले. आपल्या सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेऊन भाजप सरकारने आपल्याला वाय दर्जाची सुरक्षा पुरवली आहे असे त्या म्हणाल्या. यात काहीही राजकारण नाही, असेही त्यांनी नमूद केले. अर्पणा यादव यांनी सन 2017 ची निवडणुक लखनौ कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लढवली होती. पण त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. यापुढील निवडणूक आपण कोणत्या पक्षातून लढवणार असे विचारता त्या म्हणाल्या की वेळ आल्यावर यावर योग्य तो निर्णय होईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.