सैफई – समाजवादी राजकारणातील सर्वांत मोठा आधारस्तंभ आणि उत्तर प्रदेशचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले “धरतीपुत्र’ मुलायमसिंह यादव यांच्या पार्थिवावर मंगळवारी त्यांच्या मूळगावी सैफई येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा अखिलेश यादव यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. मुलायमसिंह यांच्या अंतिम दर्शनासाठी लाखोंचा जनसागर लोटला होता.
82व्या वर्षी मुलायमसिंह यांनी हरियाणातील गुरुग्राम येथील एका खासगी रुग्णालयात सोमवारी अखेरचा श्वास घेतला. यानंतर सोमवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव सैफई येथे आणण्यात आले. याप्रसंगी सैफई येथे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
रिमझिम पावसात अंतिम दर्शनासाठी शेकडो रांगा लागल्याने, यादव यांचे पार्थिव सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मेळा ग्राउंडच्या आवारातील एका मोठ्या हॉलमध्ये अंत्यदर्शनासाठी नेण्यात आले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर राव, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आदींनी अंतिम दर्शन घेतले.