पौड – श्री गणरायाचे आगमन अवघ्या आठ दिवसांवर आले आहे, त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही हा श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वांचीच धडपड सुरू आहे. दिवसेंदिवस डॉल्बी डीजेवर येणारे निर्बंध पाहात गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक वाद्यांना पुन्हा जोरदार मागणी आली असून त्यातही ढोल ताशांच्या “कर्र…..कटक” आवाजाची गणपती मंडळांना वेगळीच भुरळ असल्याने ढोल-ताशा मंडळी जोरदार सराव करीत आहेत.
डॉल्बी डीजेची संस्कृती काही वर्षांपूर्वी उदयास आली आणि ढोल लेझीम होणारा “कर्र…..कटक” आवाज तसेच झांजपथकांचा बाजही जाऊ लागला होता. परंतु डीजेवर बंदी आल्यानंतर पुन्हा झांज पथकांना सुगीचे दिवस आले. एका झांज पथकामध्ये 50 ते 100 मंडळाचे कार्यकर्ते असतात यामध्ये ढोल डान्स ताशा यांचा वापर करण्यात येतो. गणपती बापा काही दिवसांवर आल्याने मुळशी तालुक्यातील ग्रामीण भागातील ढोल-लेझीम पथकांनी आपली तयारी सुरू केली आहे. शहरात होणाऱ्या मोठ्या मागणींमुळे ग्रामीण भागातील तरुण आणि आबालवृद्ध मिळून एकत्र गावोगावी ढोल लेझीम तसेच झांज पथक स्थापन केली आहे. त्यामुळेच का होईना मुळशीकर पुणे, मुंबई येथील गणपती मंडळांच्या मिरवणुकीच्या सुपारी घेतात. एका तासाला साधारणत 25 ते 30 हजार रुपये ही पथके घेतात. शहरालगत असलेल्या भुकूम, पिरंगुट, पौड, उरवडे, भादस मुळशी, माले, खारवडे, सावरगांव अशा विविध गावाच्या ठिकाणी ही पथके पाहायला मिळतात.
पथकांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना देणार मदत
ग्रामीण भागातील युवक या सुपारीचे पैसे सामाजिक कार्यासाठी वापरतात तसेच आपल्या गावच्या विकासासाठीसुद्धा ते पैसे वापरले जातात. यंदा जास्त सजावट आणि मिरवणुकांमध्ये पैसे न घालवता ते पैसे कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्तांना देणार असल्याचे गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी सांगितले.