नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षपद निवडणूक दिवसागणिक नाट्यमय वळण घेत असतानाच आता आणखी एक नाव पुढे आले आहे. कॉंग्रेस नेते मुकूल वासनिक हे पक्षाचे अधिकृत उमेदवार ठरू शकतात, असे वृत्त एका वाहिनीने दिले आहे.
ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे पक्षश्रेष्ठींचा पाठिंबा असणारे उमेदवार ठरतील, अशी चर्चा गुरूवारी दिवसभर होती. पण, रात्री अचानकपणे वासनिक यांचे नाव शर्यतीत आले. दिग्विजय वारंवार त्यांच्या वक्तव्यांमधून राजकीय वादांचे कारण ठरतात. त्यामुळे त्यांच्या नावाला काही ज्येष्ठ नेत्यांचा विरोध असल्याचे समजते. त्यातून लो-प्रोफाईल राहणाऱ्या वासनिक यांच्या नावाला पसंती दिली जात आहे.
महाराष्ट्रातील नेते असणाऱ्या वासनिक यांना निवडणूक लढवण्यासाठी राजी करण्याचे प्रयत्नही पक्षात सुरू झाले, असे त्या वृत्तात नमूद करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्याचा (शुक्रवार) दिवस अखेरचा आहे. त्यामुळे उद्या निवडणुकीविषयीचे सर्व चित्र स्पष्ट होईल.