विविधा : मुकेश चंद माथूर 

माधव विद्वांस 

हृदयातून आलेले शब्द भासावेत असे भावपूर्ण आवाजात गीत गाणारे मुकेश यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म दिल्ली येथे 22 जुलै 1923 रोजी झाला.गाण्याच्या आवडीमुळे त्यांनी दहावीत असतानाच शिक्षण सोडून सार्वजनिक बांधकाम विभागात काम करत संगीत साधना चालू ठेवली. त्यांच्या थोरल्या बहिणीला संगीत शिकविण्यासाठी शिक्षक येत असत, त्यावेळी ते शेजारच्या खोलीत बसून ऐकत असत. त्यांनी संगीत वाद्ये आणि गायनाचे धडे घेतले. त्यांच्या बहिणीच्या विवाहप्रसंगी त्यांचे दूरच्या नात्यातील मोतीलाल यांनी त्यांना गाताना पाहिले. त्यांच्यातील गायक ओळखून त्यांनी त्यांना त्यांच्याबरोबर मुंबईला आणले आणि पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे संगीत शिक्षणासाठी पाठविले.

मुकेश यांना अभिनय करण्याची इच्छा होती. वर्ष 1941 मध्ये त्यांना “निर्दोष’ या चित्रपटासाठी “दिल ही बुझा हुआ हो तो’ हे गाणे अभिनयासह गीत गाण्याची संधी मिळाली. त्यानंतर वर्ष 1945 मधे अभिनेता मोतीलालसाठी पार्श्‍वगायक म्हणून “पेहली नजर’ या चित्रपटसाठी “दिल जलता है तो जलने दे’ हे गीत त्यांनी हिंदी चित्रपटासाठी गायले व त्यांना पहिला ब्रेक मिळाला.

दरम्यान, मुंबईतील चौपाटी परिसरात राहणाऱ्या श्रीमंत व्यक्‍ती रायचंद त्रिवेदी यांची कन्या “सरला’ हिच्या प्रेमात ते पडले. त्यावेळी ते 22 वर्षांचे होते तर सरला 18 वर्षांची. 22 जुलै 1946 रोजी सरलाने पूजेसाठी देवळात जाण्याचे निमित्त काढले आणि देवळातून निघून थेट मुकेशबरोबर पळून जाऊन लग्न केले. पुढे त्यांना ऋता ही कन्या आणि नितीन हा मुलगा झाला. मुलांच्या जन्मांनंतर मुकेशजींच्या कारकिर्दीला बहर आला आणि त्यांची भरपूर गाणी ध्वनिमुद्रित होऊ लागली. 40 च्या दशकात मुकेशजींची बहुतेक गाणी दिलीपकुमारवर चित्रित करण्यात आली होती. 50 च्या दशकात त्यांना राज कपूरचा आवाज म्हटले जाऊ लागले. बऱ्याच मुलाखतींमध्ये स्वत: राज कपूर यांनी आपला मित्र मुकेश यांच्याबद्दल असे म्हटले आहे की, मी फक्‍त एक शरीर आहे, माझा आत्मा मुकेश आहे. पुढे त्यांनी चित्रपट निर्मिती करायचे ठरविले व वर्ष 1951 मध्ये “मल्हार’ आणि वर्ष 1956 मध्ये “अनुराग’ चित्रपटाची निर्मिती केली. “माशूका’ आणि “अनुराग’ मध्ये नायक म्हणूनही काम केले. पण हे दोन्ही चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर आपटले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे 60 चित्रपटांना आपला आवाज दिला. त्यांनी हिंदीबरोबर काही बंगाली चित्रपटांनाही आवाज दिला होता. वर्ष 1966 मध्ये “तिसरी कसम’ या चित्रपटातील “सजन रे झूठ मत बोलो’, “दुनिया बनाने वाले’, ही गाजलेली गीतकार शैलेंद्र यांनी लिहिलेली दोन गीते शंकर जयकिशन यांनी मुकेश यांच्या स्वरात संगीतबद्ध केली.

वर्ष 1955 मध्ये “श्री 420′ या राज कपूर यांच्या चित्रपटातील “मेरा जूता है जापानी’ हे शैलेंद्र यांनी लिहिलेले, लता मंगेशकर यांचेबरोबर गायलेले “ईचक दाना बीचक दाना’ हे गीतही रसिकांनी डोक्‍यावर घेतले होते. वर्ष 2016 मध्ये टपाल खात्याने त्यांच्या स्मरणार्थ एक तिकीटही वितरित केले होते. मुकेश यांचे 27 ऑगस्ट 1976 रोजी अमेरिकेच्या मिशिगन येथील डेट्रॉईट येथे निधन झाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×