श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी त्यांच्या पक्षाच्या दोन्ही राज्यसभा खासदारांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. मेहबुबा मुफ्ती यांच्या एका सहकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
मेहबुबा मुफ्ती त्यांच्या घरातून गेस्ट हाऊसमध्ये रहायला जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या खासदारांना राजीनामा द्या नाही तर निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल असे सांगितले होते. पीडीपीचे राज्यसभेमध्ये दोन खासदार आहेत. मीर फय्याज आणि नजीर अहमद अशी या खासदारांची नाव आहेत.
राज्यसभेमध्ये जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा असलेले कलम 370 रद्द करावे यासाठी विधेयक सादर करण्यात आले होते. त्यानंतर या दोन्ही खासदारांनी गोंधळ घातला होता. त्यांनी आपले कपडे फाडून हाताला काळी फीत बांधून निषेध नोंदवला होता.
“आम्हाला सुध्दा राजीनामा देण्याची इच्छा आहे. मात्र त्याआधी पक्ष श्रेष्ठींशी बोलण्याची आमची इच्छा आहे. सध्या आम्ही कोणाशीच बोलू शकत नाहीये कारण जम्मू-काश्मीरमध्ये फोनसेवा बंद करण्यात आली आहे. आम्ही आधी यावर चर्चा करु त्यानंतर निर्णय घेऊ’.
– खासदार मीर फय्याज, पीडीपी