पुणे – पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) सिंहगडावर 2 लोकनिवासांसह 3 खोल्या आणि उपहारगृहाची सोय करण्यात येत आहे. आगामी 1 महिन्यात हे पर्यटक निवास सुरू करण्यात येईल, अशी माहिती महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.
करोना सावटातून बाहेर पडतानाच, पर्यटन क्षेत्र खुले झाल्याने राज्यातील सर्वच पर्यटनस्थळांना मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी देत आहेत. पुण्यातील सर्वाधिक पसंतीचे सिंहगड हेदेखील असेच एक पर्यटन स्थळ आहे.
कौटुंबिक सहलींसोबतच शैक्षणिक आणि अभ्यास सहली, गडभ्रमंती आणि प्रीवेडिंग शुटसाठी नागरिक गडावर येत असतात. त्यांना राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे पर्यटक निवास उभारले आहे. याठिकाणी पायाभूत सुविधांसोबतच खबरदारीचा उपाय म्हणून निर्जंतुकीकरण आणि प्रथमोचाराच्या सर्व सुविधाही उपलब्ध केल्या असल्याचेही हरणे यांनी सांगितले.
गडावर मर्दानी खेळ, कलांची मेजवानी
सद्य:स्थितीत गडावर महामंडळाचे संग्रहालय आणि मर्दानी खेळांसाठी ओपन ऍम्पी थिएटरही आहे. याठिकाणी आगामी काळात राज्यातील कलाकार आणि क्रीडापटू यांच्या विविध ग्रुपकडून मर्दानी खेळ आणि कला यांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना मनोरंजन उपलब्ध होण्याबरोबरच लोककला आणि मैदानी खेळांबाबत जागृती निर्माण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा महामंडळाकडून व्यक्त करण्यात आली आहे.