एमटीडीसीचे बुकिंग फुल्ल

पर्यटकांची कोकणला पसंती : सुट्टीचा आनंद घेण्यासाठी नियोजन

पुणे – हिलस्टेशन, गडकिल्ले, समुद्रकिनारे या ठिकाणी दिवाळी साजरी करण्याबरोबरच सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी नियोजन केले आहे. रिसॉर्टचे लोकेशन चांगले, खिशाला परवडणारे दर आणि चोख सुरक्षा व्यवस्था यामुळे पर्यटकांची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) रिसॉर्टला पसंती मिळत आहे. त्यामुळे येत्या 10 नोव्हेंबररपर्यंतचे बुकींग फुल्ल झाले आहे. पर्यटकांची पसंती कोकणला सर्वाधिक असल्याचे “एमटीडीसी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिवाळी, ख्रिसमस, उन्हाळी सुट्या, सलग जोडून येणाऱ्या सुट्या यांचे नियोजन आधी एक-दोन महिने तयार होते. त्यानुसार दिवाळीच्या सुट्ट्यांमधील “एमटीडीसी’च्या रिसॉर्टचे बुकींग मागील दोन महिन्यांपूर्वीच बुकींग झाले. सहकुटुंब, मित्र, नातेवाईक यांच्यासह पर्यटनाला जाण्याचा कल वाढत आहे. इतकेच काय तर ज्येष्ठ नागरिक कल्ब, महिला मंडळांच्या सहलीचे देखील प्रमाण वाढले आहे. पूर्वी कुटुंबांसह दिवाळी घरीच साजरी करण्याकडे अधिक प्राधान्य दिले जायचे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत लक्ष्मीपूजन, पाडवा असे दिवस वगळून पर्यटन अथवा मामांच्या गावाला जाण्यास पसंती दिली जायची. मात्र, आता दिवाळी देखील कोकण अथवा थंड हवेच्या ठिकाणी साजरी करण्याची पद्धत रुढ होताना दिसत आहे. देवदर्शनाबरोबरच कोकणात जाण्याकडे जास्त कल वाढत आहे. “एमटीडीसी’च्या तारकर्ली, आंबोली, हरिहरेश्‍वर, वेळणेश्‍वर, गणपतीपुळे, महाबळेश्‍वर, माथेरान, कार्ला येथील बुकींग फुल्ल झाले आहेत.

दिवाळी साजरी करण्यासाठी नागरिक आता शहराच्या बाहेर आणि निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यास पसंती देत आहे. महाबळेश्‍वर, पाचगणीला पसंती दिली आहे. तर गड किल्ल्यांचे हौस असणाऱ्यांनी रायगड, प्रतापगड गाठण्याचे ठरविले आहे. समुद्रकिनाऱ्याची ओढ असणाऱ्यांनी अलिबाग, गणपतीपुळे, दिवेआगार या स्थळांची निवड केली आहे. हॉटेल, रिसॉर्टमध्ये दिवाळीनिमित्त आकर्षक सजावट, रोषणाई करण्यात येते.

समुद्रकिनारे
हर्णे, वेळास, गणपतीपुळे, श्रीवर्धन, दिवेआगार, गुहागर, तारकर्ली, हरिहरेश्‍वर, वेंगुर्ला, वेळणेश्‍वर.


हिलस्टेशन
महाबळेश्‍वर, पाचगणी, माथेरान, भीमाशंकर, लोणावळा, खंडाळा, ताम्हिणी घाट, वाई, पन्हाळा, माळशेजघाट,अंबोली, भंडारदरा, चिखलदरा, तापोळा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.