नवी दिल्ली – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग यांची गुणवत्ता अफाट आहे, त्यामुळे पुढील काळातही त्यांना पर्याय मिळू शकत नाही, त्यांची जागा घेण्याची पात्रता सध्यातरी कोणा खेळाडूकडे नाही, अशा शब्दांत निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी या जोडगोळीचे कौतुक केले आहे.
रांचीसारख्या गावातून भारतीय संघात पदार्पण केलेल्या धोनीने बेस्ट फिनिशरचा रोल सातत्याने यशस्वी साकारत भारतीय संघाला विश्वकरंडकासह विविध मानाच्या स्पर्धांचे विजेतेपद मिळवून दिले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मानाच्या तीन स्पर्धा त्याने संघाला जिंकून दिल्या. भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वकरंडक, चॅम्पियन्स करंडक आणि 2011 सालचा मुख्य विश्वकरंडक अशा तीनही स्पर्धांच्या विजेतेपदात धोनीचे योगदान खूपच महत्त्वाचे ठरले आहे.
केवळ धोनीच नव्हे तर धडाकेबाज युवराजसिंगने आपल्या खेळाने संघाच्या विजयात मोलाची कामगिरी केली आहे. त्याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे, आणि ते वारंवार सिद्धही झाले. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने स्टुअर्ट ब्रॉडला मारलेले सलग सहा चेंडूतील सहा षटकार चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. याच दोन खेळाडूंनी भारतीय संघाच्या यशाचा आलेख सातत्याने उंचावला आहे. त्यांची कामगिरी तसेच मैदानाबाहेरील वर्तन आदर्शवत राहिले आहे, अशा शब्दांत प्रसाद यांनी गौरवोद्गार काढले.
या खेळाडूंची जागा घेतील असा एकही खेळाडू सध्यातरी दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्याच सारखे क्रिकेटपटू मिळणे कठीणच नव्हे तर अशक्य आहे. असे महान खेळाडू वारंवार घडत नाहीत, असेही प्रसाद यांनी सांगितले.