नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी हा वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेवून दोन महिन्यांसाठी भारतीय लष्करात दाखल झाला आहे. 31 जुलैपासून धोनीने लष्करात सेवा देण्यास सुरुवात केली. त्यातच धोनीचा भारतीय लष्कराच्या कॅम्पमधील पहिला फोटो समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशलमीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत धोनी लष्करी जवानांच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. क्रिकेटचे मैदान गाजवणारा आपल्यासोबत काम करत असल्याने जवानांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्यांना त्यांच्याकडे असलेल्या बॅटवर धोनीची स्वाक्षरी व त्याच्यासोबत फोटो घेण्याचा मोह देखील आवरता आलेला नाही. महेंद्रसिंग धोनी ज्या बटालियनमध्ये सहभागी होऊन पहारा देणार आहे, ती बटालियन विशेष सैनिकांची आहे. यात देशातील प्रत्येक विभागातून आलेले सैनिक आहेत. धोनीला येथे दिवस आणि रात्र अशा शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. यावेळी धोनीकडे पाच किलो वजनाच्या 3 मॅग्जीन, 3 किलोचे पोशाख, 2 किलोची बूटं, 4 किलोचे 3 ते 6 ग्रेनेड, 1 किलोचे हॅल्मेट आणि 4 किलोचे बुलेटप्रुफ जॅकेट असे एकूण 19 किलो वजन असणार आहे.