चेन्नई – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमासाठी सराव सुरु केला. यंदा चेन्नई संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी धोनी सज्ज होत असल्याने चाहत्यांनाही दिलासा मिळाला आहे. अमिरातीत गेल्या मोसमात झालेल्या स्पर्धेत चेन्नई संघाला अपयश आल्यामुळे चाहत्यांना यंदाच्या मोसमात काय होणार याची चिंता वाटू लागली होती. मात्र, आता संघाच्या सरावामुळे चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदाच्या स्पर्धेला येत्या 9 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी सर्वच संघांनी तयारी सुरु केली आहे. 10 मार्चपासून चेन्नईमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सराव सत्र सुरु झाले. संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या आयपीएलच्या गेल्या वर्षीच्या मोसमानंतर धोनी प्रथमच मैदानावर सरावासाठी उतरला.
आयपीएलच्या गेल्या मोसमात चेन्नईची कामगिरी अत्यंत सुमार झाली होती. तसेच खुद्द धोनीच्या कामगिरीवरही टीका झाली होती. त्यामुळे आता यंदाच्या स्पर्धेत धोनीचा चेन्नई संघ गतवैभव मिळवणार का याचीच चाहत्यांमध्ये उत्सूकता आहे.
ट्विटर हॅंडलवर धोनीचा नवा लुक असलेला फोटो पोस्ट झाला. पूर्ण टक्कल केलेला व भिक्षूचे कपडे धारण केलेल्या धोनीचा हा नवा लुक चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनला.
क्या है इस अवतार के पिछे का मंत्रा, जल्द ही आपको पता चलेगा, अशी टॅगलाइन धोनीने टाकली असून हे काय नविन प्रकरण आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला. मात्र, आगामी काळात प्रसारीत होत असलेल्या एखाद्या जाहिरातीसाठी धोनीने केलेली ही नवी स्टाइल असल्याचाही अंदाज व्यक्त होत आहे.