युनायटेड किंगडम – भारतीय संघाचा महान कर्णधार एमएस धोनीने गुरुवारी त्याचा 41 वा वाढदिवस साजरा केला. सध्या धोनी आणि त्याचे कुटुंब इंग्लंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या वाढदिवसासाठी युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही उपस्थित होता. धोनीची पत्नी साक्षी धोनीने वाढदिवसाच्या पार्टीतील खास व्हिडिओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
महेंद्रसिंह धोनीने त्याचा यावर्षीचा वाढदिवस कुटुंबीय आणि मित्रांसोबत साजरा केला आहे. साक्षी धोनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत धोनीची मुलगी झिवा आणि जवळच्या मित्रमंडळीसोबत वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. यावेळी भारतीय संघाचा नियमित यष्टीरक्षक ऋषभ पंत सध्या संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर असून, धोनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तो उपस्थित राहिला होता.
तसेच विराट कोहलीनेही भारतीय संघाची जर्सी आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) जर्सीमधील धोनीसोबतचे दोन फोटो शेअर करत खास मेसेज लिहिला. कोहली म्हणाला, एक असा लीडर, त्याच्यासारखं कोणी नाही. तू भारतीय क्रिकेटसाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद. तू माझ्या मोठ्या भावापेक्षा जास्त आहेस. तुझ्याबद्दल प्रेम आणि आदर. वाढदिवसाच्या शुभेच्छा कॅप्टन.
दरम्यान, जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटूंसह अनेक क्षेत्रांमधील व्यक्तींनी धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.