#CWC19 : माहीचा सल्ला मानला व हॅट्ट्रिक झाली; शमीकडून धोनीचे आभार

साउदॅम्पटन – मोहम्मद नबी याला बाद केल्यानंतर उर्वरित दोन्ही फलंदाजांना यॉर्कर चेंडू टाकण्याचा सल्ला महेंद्रसिंग धोनी याने दिला व मी त्याप्रमाणे चेंडू टाकले. त्यामुळेच हॅट्ट्रिक करण्याचा मान मला मिळाला असे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने सांगितले.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातील 50 व्या षटकांत शमी याने हॅट्ट्रिक केली. विश्‍वचषक स्पर्धेत हॅट्ट्रिक करणारा तो भारताचा दुसरा गोलंदाज आहे. 1987 मध्ये चेतन शर्मा याने हॅट्ट्रिक केली होती.

शमी म्हणाला, शेवटच्या षटकात नबी याने चौकार मारून आम्हाला काळजीत टाकले होते. तथापि धोनी माझ्याकडे आला व त्याने मी कसे चेंडू टाकावेत याबाबत मला मौलिक मार्गदर्शन केले. लगेचच उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात नबी बाद झाला व आमच्या विजयाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला. भुवनेश्‍वर जखमी झाल्यामुळे मला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. माझ्यावर जबाबदारी होती तसेच संधीचे सोने कसे करता येईल हेदेखील माझ्यासाठी महत्त्वाचे होते. सरावाच्या वेळी तंदुरुस्तीस प्राधान्य देतो. वेगवान गोलंदाजांसाठी तंदुरुस्ती खूप महत्त्वाची असते.

Leave A Reply

Your email address will not be published.