दुबई -भारतीय संघाचा माजी कर्णधार व चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध बिगबॅश टी-20 लीग स्पर्धेत खेळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यंदा अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेच अत्यंत सुमार कामगिरी केल्यानंतरही त्याला बिगबॅशमध्ये खेळण्यासाठी आमंत्रण मिळाले आहे.
आता बीसीसीआय त्याला या स्पर्धेत खेळण्याची परवानगी देणार का, हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी जवळपास दीड वर्षांच्या खंडानंतर यंदाच्या आयपीएल स्पर्धेत खेळत आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार बिगबॅश लीग स्पर्धेतील विविध संघांनी धोनीसह सुरेश रैना, युवराजसिंग यांना आपल्या संघात स्थान देण्याची तयारी दर्शवली आहे. यंदाच्या बिगबॅश स्पर्धेच्या मोसमात सहभागी संघांना दोनऐवजी तीन परदेशी खेळाडू घेण्याची परवानगी देण्यात आल्याने त्यांच्याकडून या तीन खेळाडूंसह आणखीही काही भारतीय खेळाडूंना प्रस्ताव दिला जाणार आहे. जे खेळाडू निवृत्त झाले आहेत तसेच त्यांना जर बीसीसीआयने परवानगी दिली तरच या खेळाडूंना बिगबॅश स्पर्धेत खेळता येणार आहे.