प्रशिक्षक केशव रंजन बॅनर्जींचे मत
पुणे – करोनामुळे ऑस्ट्रेलियात यंदा होणारा टी-20 विश्वकरंडक पुढे ढकलला गेल्यामुळेच माहीने निवृत्तीचा निर्णय घेतला, असा दावा त्याचे पहिले प्रशिक्षक केशव रंजन बॅनर्जी यांनी दैनिक प्रभातशी बोलताना व्यक्त केला.
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याच्या संथ फलंदाजीवर टीका झाली होती. त्यानंतर त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. त्यावेळीच त्याच्या मनात विचारांचे काहूर निर्माण झाले होते. वय वाढल्याची जाणीव त्याला झाली होती. मात्र, यंदा होणारी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा खेळण्याची जिद्दही त्याने बोलून दाखवली होती. मात्र, करोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली व धोनी खूप निराश झाला. तो आता 39 वर्षांचा आहे, ही स्पर्धा पुढील वर्षी भारतात होणार असली तरीही त्यावेळी तो वयाची चाळिशी पार करेल. त्याचबरोबर आयपीएल वगळता यंदा त्याला कोणत्याही स्पर्धेद्वारे संघात पुनरागमन करता येणार नसल्याचेही स्पष्ट झाले त्यामुळेच त्याने निवृत्ती जाहीर करण्यासाठी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त काढला, असे मतही बॅनर्जी यांनी व्यक्त केले.
यंदा आयपीएल वगळता धोनीला खेळण्यासाठी निदान यंदाच्या वर्षात तरी योग्य मालिका होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. डिसेंबर महिन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा नियोजित आहे. मात्र, या दौऱ्यात भारतीय संघ 4 कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये जरी त्याने खेळण्याचा निर्णय घेतला असला तरीही आणखी जवळपास सहा महिने भारतीय संघ टी-20 किंवा एकदिवसीय मालिका खेळणार नाही हे स्पष्ट झाल्यानेच त्याने हा निर्णय घेतला, असेही बॅनर्जी यांनी सांगितले.