महेंद्रसिंग धोनी : क्रिकेटचे मैदान ते बटालियन

भारताचा आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सध्या क्रिकेटच्या मैदानात क्रिकेट खेळत नसून तो आपली लष्करी सेवा बजवण्यासाठी काश्‍मीर खोऱ्यात तैनात आहे. धोनी हा क्रिकेटमधील सर्वात हुशार आणि चाणाक्ष कर्णधार समजला जातो कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यायचा याची त्याला चांगली जाण आहे.

मैदानावर आश्‍चर्यकारक निर्णय घेऊन ते यशस्वी करण्याचा हातखंडा त्याच्याकडे आहे, म्हणूनच तो भारताचाच नाही तर जगातला महान कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्याच्या कुशल नेतृत्वामुळेच भारताला 2007 साली टी20 चा विश्‍वकप 2011साली 50 ओव्हरचा विश्‍वकप, 2013 साली चॅम्पियन ट्रॉफी जिंकता आली. शिवाय तोच कर्णधार असताना भारत पहिल्यांदा कसोटी नामांकनात अव्वल स्थानी पोहचला होता. विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची अनपेक्षितपणे एक्‍झिट झाल्यानंतर धोनीच्या क्रिकेटमधील भावितव्याविषयी प्रसार माध्यमात चर्चा होऊ लागली काहींनी त्याला रिटायर करा असा सल्ला दिला तर काहींनी त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यातून वगळण्याची मागणी केली.

प्रसारमाध्यमात त्याच्याविषयी अशा उलट सुलट बातम्या येत असताना त्याने आपल्या स्वभावानुसार सर्वांना आश्‍चर्याचा धक्का देत वेस्टइंडिज दौऱ्यातून माघार घेतली आणि सरळ आपल्या 106 प्रादेशिक आर्मी बटालियनमध्ये (पॅराशूट)े दाखल झाला. त्याला देशसेवेत झोकून द्यायचे आहे. यासंदर्भात त्याने बटालियन मधील आपल्या वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर त्याने थेट काश्‍मीर गाठले. सध्या तिथे त्याचे खडतर प्रशिक्षण सुरु आहे. एखाद्या नियमित आर्मी ऑफिसरसारखा तो आपल्या बटालियनमध्ये राहणार असून इतर आर्मी ऑफिसर प्रमाणेच सेवा बाजावणार आहे. यादरम्यान त्याला कोणतीही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळणार नाही.

धोनी सेलेब्रेटी असल्यामुळे त्याच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्‍न जेंव्हा भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांना पत्रकारांनी विचारला तेंव्हा बिपिन रावत म्हणाले, धोनीला सुरक्षा पुरवण्याची गरज भासेल असे आम्हाला वाटत नाही. तो त्याचे रक्षण करण्यास समर्थ आहे.त्याला दिलेले कार्य तो नक्कीच पूर्ण जबाबदारीने पार पाडेल. लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी धोनीविषयी कमालीचा विश्‍वास दाखवला आहे. धोनीचे देशप्रेम देशाप्रती असणारी त्याची जबाबदारीची भावना लष्करात सेवा करण्याची त्याची प्रबळ इच्छा, त्याने घेतलेले खडतर प्रशिक्षण यामुळेच लष्करप्रमुखांना धोनीविषयी हा विश्‍वास निर्माण झाला आहे.

2011 सालचा विश्‍वकप जिंकल्यानंतर त्याने टेरिटोरीयल आर्मी जॉईन केली. या आर्मीच्या 106 बटालियनचा तो मानद लेफ्टनंट कर्नल आहे. 2015 मध्ये पॅराशूटर म्हणून तो पात्र ठरला होता. पाच प्रकारची पॅराशूट प्रशिक्षण पूर्ण करताना त्याने आग्रा येथे लष्करी विमानातून पॅराशूटच्या साहाय्याने खाली उडी घेतली होती. आग्र्याच्या लष्करी कॅम्पच्या ठिकाणी त्याचे हे प्रशिक्षण झाले. धोनी हा कमालीचा देशप्रेमी आणि समर्पित व्यक्ती आहे. त्याला लष्कराप्रती कमालीचा अभिमान व आदर आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मविभूषण हा मानाचा पुरस्करही त्याने लष्करी गणवेशातच स्वीकारला. नुकत्याच झालेल्या विश्‍वकप स्पर्धेच्या पहिल्या आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने बटालियनचे सिम्बॉल असलेले ग्लोव्हज वापरले होते. त्याला हवे असते तर लष्करातील कोणतीही कमी कष्टाची ड्युटी तो बजावू शकला असता पण त्याने स्वतःहून आपले काश्‍मीरमधील बटालियन निवडले आहे व ड्युटी देखील सर्वसामान्य लेफ्टनंट कर्नल सारखीच बजावणार आहे.

धोनीने हे पद मिरवण्यासाठी नाही तर देश सेवा करण्यासाठी स्वीकारले आहे म्हणूनच धोनी हा फक्त क्रिकेट रासिकांच्याच नव्हे तर सैनिकांच्याही गळ्यातील ताईत बनला आहे. लष्करात सेवा करण्याच्या धोनीच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. धोनीच्या प्रखर देशभक्तीमुळे त्याच्या विषयीचा आदर कमालीचा वाढला आहे. खेळापेक्षा देशसेवा महत्वाची मानणारे धोनीसारखे खेळाडू विरळच आहे. त्याची समर्पित वृत्ती व देशभक्तीतुन अनेकांना स्फूर्ती मिळणार हे निश्‍चित धोनीच्या या धाडसी निर्णयाबद्दल धोनीला सॅल्यूट!!!

श्‍याम बसप्पा ठाणेदार

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.