रांची – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व बेस्ट फिनिशर महेंद्रसिंह धोनीने येथील विमानतळावर लावण्या नावाच्या एका दिव्यांग चाहतीची भेट घेतली. तिच्याशी संवाद साधताना लावण्यासह धोनीलाही अश्रू अनावर झाले. हा प्रसंग पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही धोनीची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नसल्याचेच या क्षणाने सिद्ध केले.
रांचीच्या विमानतळावर या दिव्यांग चाहतीची भेट घेतल्यावर त्याची पोस्टही सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरली.
धोनीची भेट झाल्यावर लावण्या रडू लागली, त्यावेळी तिची समजूत घालताना धोनीलाही रडू कोसळले. या भेटीत लावण्याने धोनीचे स्केचही त्याला भेट म्हणून दिले. जोपर्यंत मी या जगात आहे, तोपर्यंत मी धोनीचीच चाहती असेन, असा संदेश तिने या स्केचवर लिहिला आहे.