अनेकांना गुरुस्थानी असलेल्या मृणाल मोरे (गुरुपौर्णिमा विशेष)

नुकतेच 17 जुलै रोजी सामाजिक कार्यकर्त्या मृणाल गोरे यांचे पुण्यस्मरण झाले. ग्रामपंचायत सदस्य, महानगरपालिकेत नगरसेवक, विधानसभेत आमदार/विरोधी पक्षनेता, लोकसभेत खासदार अशा चढत्या कमानीने राजकीय ठसा उमटविलेल्या आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरुस्थानी मानलेल्या आदरणीय महिला म्हणून त्यांची ओळख सदैव राहील. घरातील भावंडे वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी, वडील प्राचार्य अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असूनही शिक्षण सोडून त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले.

निखळ चरित्र, त्यागमय जीवन आणि गोरगरीबांबद्दलची अपार करुणा या त्रिसूत्रीवर त्यांचे कार्य उभारलेले होते. बंडू गोरे यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या गोरेगाव उपनगरातील टोपीवाला बंगल्यात राहायला आल्या. तेथे त्यांनी सामाजिक टीका होत असतांनाही 15 वर्ष संतती नियमन प्रसाराचे केंद्र चालविले. मधू लिमये, एस. एम. जोशी यांच्या विचाराने प्रभावित झाल्या होत्या. उत्तर मुंबईतील पाण्याचा प्रश्न त्यांनी ज्या हिरीरीने मांडला व त्यासाठी त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे त्या “पाणीवाली बाई’ म्हणूनच प्रसिद्ध झाल्या. तर 1972 च्या दुष्काळात झालेल्या टंचाईवर शासनास त्यांनी जाग आणण्यासाठी त्यांनी अभूतपूर्व “लाटणे मोर्चा’ काढला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रमिला दंडवते अहिल्याबाई रांगणेकर, कमलाताई देसाई, तारा रेड्डी अशा महिला नेत्यांनी त्यांना जबरदस्त साथ दिली. विशेष करून मोलमजुरी करणाऱ्या स्त्रियांना त्यांनी संघटीत केले. एका आंदोलनात शासनाने त्यांना पकडले आणि काही काळ महारोगी, वेड्या स्त्री कैद्यांच्या सहवासात ठेवले तरी त्या डगमगल्या नाहीत. त्यांचा पिंड समाजवादी चळवळीचा अंगणवाडी सेविका तसेच कचरा उचलणाऱ्या स्त्रियांचे प्रश्नही त्यांनी उचलून धरले होते. त्यासाठी लाटणे, थाळीवादन, घेराव तसेच न्यायालयातील याचिका यांचाही वापर केला. तर विधानसभेत वडखळ नाका व दर्डा प्रकरण, अंतुल्याचे सिमेंट प्रकरण मृणालताईंनी लावून धरले. आणिबाणीमध्ये भूमिगत राहून त्यांनी आपले कार्य चालू ठेवले होते. त्यांना संधी असूनही त्या सत्तेपासून दूर राहिल्या. सन 1977 मध्ये पंतप्रधान मोरारजी देसाईंनी त्यांना मंत्रिपद देऊ केले होते. पण त्यांनी जनतेत मिसळूनच कार्य करण्याचे अंगिकारले. त्यांनी केलेली एक अभूतपूर्व गोष्ट म्हणजे निवारा परिषदेमार्फत सामान्य जनतेकडून पैसे गोळा करून 350 गृहनिर्माण संस्था स्थापन केल्या, तर दिंडोशी येथे शासनाकडून जमीन मिळवून हजारो लोकांना निवारा उपलब्ध करून दिला. पती केशव गोरे यांच्या स्मरणार्थ गोरेगाव येथे केशव गोरे ट्रस्ट उभा करून त्यामार्फतही त्यांनी समाजाची सेवा केली.

– माधव विद्वांस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)