नाभिक समाजाची अपेक्षा; व्यवसायासाठी मिळावे सुलभ कर्ज
अविनाश काशीद
पुसेसावळी – समाजानुसार व्यवसाय करण्याचा आता जमाना राहिलेला नाही, पूर्वी चर्मकार चपला-जोडे शिवायचे, शिंपी कपडे शिवायचे कालानुरूप या संकल्पना पुसट झाल्या असून वेगवेगळ्या समाजाचे लोक स्वत:मधील कौशल्यानुरूप व्यवसाय करू लागले आहेत. पण पारंपरिक व्यावसायिकांमधील कौशल्याला सरकारचे प्रोत्साहन मिळत नसल्याचे चित्र आहे.एकीकडे देशातील काही राज्यांमध्ये नाभिकांसाठी केश कला बोर्ड सुरू झालेले असताना दुसरीकडे महाराष्ट्रात आताही केशकर्तनालय सुरू करण्यासाठी लागणारे भांडवल गोळा करताना बॅंकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
राज्यात नाभिक समाजाची लोकसंख्या 45 लाख आहे.
नाभिक समाज शहर आणि लहान-मोठ्या गावखेड्यांमध्ये विखुरलेला आहे. त्यातील 80 ते 90 टक्के समाजबांधव पारंपरिक केशकर्तनाचा व्यवसाय करतात. तर सरकारी नोकरीच्या क्षेत्रात यांचा टक्का 0.2 इतका आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पारंपरिक केस कापण्याच्या व्यवसायात कार्यरत असलेल्या समाजाला सहाय्यभूत ठरणाऱ्या कोणत्याही शासकीय सुविधा महाराष्ट्रात उपलब्ध नाहीत.
त्याचा फटका केशकर्तनकारांना बसतोय. राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये नाभिकांना आधार देण्यासाठी केशकला बोर्ड स्थापन करण्यात आले आहे. याअंतर्गत व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, नाभिकांना विविध प्रकारची मदत करणे आदी कार्य सुरू आहे.
स्वतंत्र अशा केशकला बोर्डमुळे आज कमी व्याजदरात कर्ज मिळत आहे. त्यामुळे स्वत:चे सलून सुरू करण्याचे अनेक व्यावसायिकांचे स्वप्न पूर्णत्वास येत आहे. याशिवाय वयाच्या 55 व्या वर्षांनंतर पेन्शन, गर्भवती महिलेच्या प्रसुतीचा खर्च, विद्यार्थ्यांना अल्प व्याजदरात शैक्षणिक कर्ज, नाभिक व्यावसायिकाला सलूनसाठी जागा अथवा गाळा उपलब्ध करून देण्याचे कार्य बोर्डद्वारे सुरू आहे. याशिवाय, केशकला बोर्डचे अध्यक्ष नाभिक समाजातील व्यक्तीच राहात असून, त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात आला आहे.
या तिन्ही राज्यांमध्ये नाभिकांबाबत सरकारने संवेदनशील भूमिका घेतली आहे. परिणामत: तेथील नाभिक समाज आज राज्याच्या प्रगतीमध्ये हातभार लावू शकत आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातसुद्धा केश कला बोर्ड अथवा श्री संत सेना आर्थिक विकास महामंडळ स्थापना व्हायला हवे अशी मागणी नाभिक समाजाकडून होत आहे.
नाभिक समाजाच्या प्रमुख मागण्या
श्री संत सेना आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे
नाभिक ही जात अनुसूचित जातीत समाविष्ट करावी
क्रिमिलेअर, नॉन क्रिमिलेअरची अट रद्द करावी
नाभिक समाजासाठी राखीव जागा देण्यात याव्यात
रेल्वे, बसस्थानक याठिकाणी सलुन दुकानांसाठी राखीव गाळे ठेवण्यात यावे
ऍट्रॉसिटी ऍक्टमध्ये समाजाचा समावेश करावा
प्रतापगडावर जिवाजी महालेंचे स्मारक बांधावे
पन्हाळगड येथे शिवा काशीद यांच्या स्मारकास पर्यटनस्थळ घोषित कराव