Modi-Trump Meeting । पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर होते. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत ट्रम्प यांनी मोदींना दिलेल्या खास भेटवस्तूची चर्चा रंगली आहे.
डोनाल्डर यांनी या भेटीत पंतप्रधान मोदींनी ‘आवर जर्नी टुगेदर’ हे कॉफी टेबल बुक भेट म्हणून दिले. या कॉफी टेबल बुकवर ट्रम्प यांची स्वाक्षरी व संदेश देखील आहे. यावर ‘मिस्टर प्राइम मिनिस्टर, तुम्ही ग्रेट आहात.’, असा संदेश लिहिलेला आहे.
‘आवर जर्नी टुगेदर’ हे 320 पानांचे पुस्तक आहे. यामध्ये ‘हाउडी मोदी’ आणि ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमांचाही उल्लेख आहे. वर्ष 2019 मध्ये अमेरिकेतील ह्यूस्टन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हजारो भारतीय-अमेरिकन नागरिक उपस्थित होते. अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये पार पडलेल्या ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमाचेही यात फोटो देण्यात आले आहेत.
‘आवर जर्नी टुगेदर’ मध्ये ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षीय कार्यकाळातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख आहे. यात किम जोंग-उन, शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन यांसारख्या जागतिक नेत्यांसोबतच्या बैठकींचाही उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, ट्रम्प – मोदी भेटीत अनेक महत्त्वाचे करार व घोषणा करण्यात आल्या आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारताच्या ताब्यात देणार असल्याचे सांगितले. दोन्ही देशात संरक्षण क्षेत्रातील मोठा करार झाला आहे. या करारानुसार, अमेरिका आता भारताला F35 स्टेल्थ लढाऊ विमान पुरवणार आहे.