पुणे – राज्यातील विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यावेळी भाजपनेत्या पंकजा मुंडे यांना संधी मिळेल, अशी शक्यता होती. मात्र यावेळी देखील भाजपने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना डावलून महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे.
पंकजा मुंडे यांना डावलल्याने राज्यातील त्यांच्या समर्थकांमध्ये पुन्हा एकदा नाराजी पसरली आहे. त्याचवेळी पंकजा यांना डावलून ज्यांना उमेदवारी दिली त्या उमा खापरे यांची प्रतिक्रिया आली आहे. भाजपने मला उमेदवारी दिल्याचा पंकजा ताईंनाही आनंद होईल, असं उमा खापरे यांनी म्हटलं आहे.
उमा खापरे म्हणाल्या की, पंकजा ताई आमच्या नेत्या आहे. मी त्यांच्यासमोर छोटी कार्यकर्ती आहे. वास्तविक पाहता, त्या स्पर्धेत असल्याने मी उमेदवारी मागितली नव्हती. परंतु अनपेक्षितपणे माझी वर्णी लागली. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे असते तर त्यांनाही आनंद झाला असता, तसाच आनंद पंकजा ताईं यांना झाला असेल, असा विश्वासही उमा खापरे यांनी व्यक्त केला.