सिनेसृष्टीतील नायिकांच्या नखऱ्यांची बरीच चर्चा होते. पण आमीरखानसारखे नायकही अनेक अटी-शर्थींवर काम करत असतात. आमीरची ओळख “मिस्टर परफेक्शनिस्ट’ अशी असली तरी त्याच्या तालावर नाचताना अनेकदा दिग्दर्शकांची ओढाताण होते.
अलीकडेच आमीर खान “लालसिंह चढ्ढा’ या चित्रपटाचे पंजाबमधील चित्रीकरण संपवून परतला आहे. या चित्रीकरणादरम्यान आमीर सातत्याने कथानक वाचताना दिसला. अर्थात, कोणताही चित्रपट स्वीकारताना आणि स्वीकारल्यानंतर त्याच्या स्क्रिप्टचा किस काढणे यासाठी आमीर सिनेसृष्टीत ओळखला जातो. स्क्रिप्टमध्ये बदल सुचवणे आणि करावयास भाग पाडणेही तर आमीरसाठी अगदी सामान्य बाब आहे.
त्यामुळे त्याच्यासोबत ताळमेळ बसवणे दिग्दर्शकांना खूप कठीण जाते.
लालसिंह चढ्ढा चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे चंदन हे गेल्या अनेक वर्षांपासून आमीरचे सहकारी राहिलेले आहेत. यापूर्वी “सिक्रेट सुपरस्टार’ सारखा सुपरहिट चित्रपट या जोडीने एकत्रित केला आहे. त्यामुळे आमीरचा स्वभाव, सवयी, अटी-शर्थी यांविषयी चंदन पुरेपूर जाणून आहेत.
पण शेवटी तो आमीर खान! त्याने या चित्रपटामध्ये त्याच्यावर चित्रीत असा एकही लॉंग शॉट असता कामा नये अशी अट घातली होती. चंदन यांनी ती स्वीकारली आणि त्यानुसार चित्रीकरण केले. मागील काळात “पीके’ चित्रपटात लॉंग शॉट ठेवल्यामुळे आमीरने दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासोबत भांडण काढलं होतं. चंदन यांना कदाचित ते माहीत असावं!