प्रसिद्ध कॉमेडियन, लेखक, रोवन एटकिन्सन अर्थात मिस्टर बिन यांचा नुकताच वाढदिवस झाला. यानिमित्त जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. जगभरात रोवन यांची ओळख मिस्टर बिन अशीच आहे. रोवन यांनी अनेक सिनेमे, नाटकात भूमिका साकारली आहे.
मिस्टर बिन अशी ओळख असलेल्या रोवन एटकिन्सन यांनी मोठी घोषणा केली आहे. यापुढे मिस्टर बिन ही भूमिका साकारणार नाही, असे रोवन यांनी जाहीर केले. वाढदिवशीच मिस्टर बिन यांनी आपल्या पात्राला अलविदा केल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.
हे पात्र तणावपूर्ण आणि थकवणार आहे. त्यामुळे ते अधिक जबाबदारीने साकारावे लागते. आता त्या पात्रात तेवढी मजा राहिली नाही. त्यामुळे यापुढे मिस्टर बिन हे पात्र साकारणार नाही, हे पात्र आता थांबायला हवे, असे रोवन एटकिन्सन यांनी म्हटले.
दरम्यान, मिस्टर बिन हे पात्र पहिल्यांदा टीव्हीवर 1990 मध्ये झळकले होते. परदेशात प्रसिद्ध असलेले मिस्टर बिन भारतातही तितकेच लोकप्रिय ठरले. हे पात्र किती लोकप्रिय आहे, त्याचा अंदाज फेसबकवरूनही येऊ शकतो. कारण जगभरातील प्रसिद्ध फेसबुक पेजमध्ये मिस्टर बिन हे पेज सर्वाधिक लाईक्स मिळवणाऱ्यांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे.