“एमपीएससी’चा बायोमेट्रिक हजेरीला “फाटा’

परीक्षेत डमी उमेदवार तथा गैरप्रकाराला पायबंदाबाबत प्रश्‍नचिन्ह
 
पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यापुढे परीक्षेच्या वेळी उमेदवारांची बायोमेट्रिक हजेरी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार यापूर्वी झालेल्या परीक्षेत ही पद्धत राबविण्यात आली. मात्र, रविवारी झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेत परीक्षार्थी उमेदवारांची बायोमेट्रिक हजेरी न घेता परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे आयोगाने बायोमेट्रिक हजेरीला फाटा दिल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. त्यामुळे राज्य सेवा परीक्षेत डमी उमेदवार तथा गैरप्रकाराला पायंबद बसणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

आयोगाद्वारे राज्यसेवा पूर्व परीक्षा राज्यभरात रविवारी घेण्यात आली. एमपीएससीद्वारे राज्यसेवेच्या 360 पदांसाठी ही परीक्षा होती. उपजिल्हाधिकारी पदासाठी 40 जागा, पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्‍त पदासाठी 31 जागा, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा पदासाठी 16 जागा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी 21 जागा, तहसीलदार पदाच्या 77 जागा, उपशिक्षणाधिकारी अथवा महाराष्ट्र शिक्षण सेवा पदाच्या 25 जागा, कक्ष अधिकारी 16 जागा, सहायक गट विकास 11 जागा, नायब तहसीलदार 113 जागांसाठी ही परीक्षा झाली. राज्यातील सुमारे 3 लाख 61 हजार उमेदवारांनी या परीक्षेला ऑनलाइन अर्ज केले होते. ही परीक्षा राज्यातील 37 जिल्हा केंद्रावर आणि 1 हजार 86 उपकेंद्रावर घेण्यात आली.

आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा दिवसभरात सुरुळीत झाली. सकाळच्या सत्रात जनरल, तर दुपारी सी-सॅटचा पेपर होता. यापूर्वीच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या परीक्षेत आयोगाने बायोमेट्रिक हजेरी घेतली होती. त्यामुळे डमी अथवा गैरप्रकारावर अंकुश बसला होता. त्याप्रमाणे याही परीक्षेत बायोमेट्रिक हजेरी घेतली जाईल, अशी उमेदवारांची अपेक्षा होती. मात्र, केवळ बोटाचे ठसे घेऊन परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात होता. बोटासे ठसे व त्याची पडताळणी यंदा करण्यात आलेली नाही. त्यामुळे काही परीक्षार्थ्यांनी आयोगाने बायोमेट्रिक हजेरीवरून “युटर्न’ घेतल्याने संताप व्यक्‍त केला आहे.

आयोगाच्या यापूर्वीच्या परीक्षेत डमी उमेदवारांचे रॅकेट सक्रिय असल्याचे प्रकरण समोर आले होते. या डमी प्रकरणामध्ये दोषी असलेल्यांना अटकही झाली होती. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षांच्या सुरक्षितेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतर राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांनी मोर्चा, आंदोलन, उपोषण करून आयोगाच्या परीक्षेत बायोमेट्रिक हजेरी करावी, अशी मागणी राज्य सरकार आणि एमपीएससी प्रशासनाकडे केली होती. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन आयोगाने बायोमेट्रिक पद्धत लागू केल्याने उमेदवारांच्या मागणीला न्याय मिळाल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. मात्र, रविवारी झालेल्या परीक्षेत बायोमेट्रिक हजेरीचा आयोगाला विसर पडल्याने उमेदवारांमधून आयोगाच्या कारभारावर संताप व्यक्‍त होत आहे.

आयोगाने उमेदवारांच्या मागणीवरून परीक्षेत बायोमेट्रिक हजेरी लागू करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी सुरू केली. मात्र, रविवारी झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेत बायोमेट्रिक हजेरीवरून आयोगाने पूर्वीची पद्धत सुरू केली आहे. त्यावरून पुन्हा परीक्षेत डमी उमेदवारांचे प्रकार समोर येण्याची शक्‍यता आहे.

– महेश बडे, परीक्षार्थी

Leave A Reply

Your email address will not be published.