पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत येत्या 4 सप्टेंबरला संयुक्त पूर्व परीक्षा होत आहे. मात्र, त्यापूर्वी आयोगाने नवीन संकेतस्थळ सुरू केल्याने अर्ज केलेल्या उमेदवारांना नव्याने प्रोफाइल अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र उमेदवारांना प्रोफाइल अपडेट करण्यास अनेक अडचणींचा सामोरे जाव लागत आहे. त्यामुळे परीक्षार्थी हवालदिल झाले आहेत.
“एमपीएससी’ने ऑनलाइन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळात बदल केला आहे. परंतु नव्याने प्रोफाइल अपडेट करताना उमेदवारांनी तांत्रिक अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात आयोगाच्या संबंधित कॉल सेंटरला फोन न उचलल्याने उमेदवारांना प्रोफाइल अद्ययावत करताना ओटीपी मिळत नाही. कोणत्याही ई-मेलला प्रतिसाद मिळत नसल्याने उमेदवार अडचणीत सापडले आहेत.
अर्ज करताना विविध पर्याय निवडता येत नाही. जुना पासवर्ड वापरून प्रोफाइल खुली होत नाही. तसेच फॉरगेट पासवर्डही होत नाही. तसेच जात वैधता प्रमाणपत्राची माहितीही भरता येत नाही. नव्याने प्रोफाइल करण्यासाठी “इडब्यूएस’ प्रमाणपत्राचा नंबर आवश्यक करण्यात आलेला आहे. परंतु “इडब्यूएस’ प्रवर्गातील उमेदवारांना स्थानिक पातळीवरील यंत्रणाकडून हे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याने उमेदवारांच्या अडचणीत भर पडली आहे.
तांत्रिक कारणाच्या पार्श्वभूमीवर येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेचे हॉलतिकीट मिळणार नसल्याने लाखो उमेदवार चिंतेत आहेत. उमेदवारांना होणाऱ्या मानसिक त्रासाचा विचार करता आयोगाने सकारात्मक निर्णय घेऊन अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी एमपीएससी स्टुडंटस राईट्सचे महेश बडे आणि किरण निंभोरे यांनी आज एमपीएससीकडे केली आहे.