संघर्षाचे फळ : करोना काळातही परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांच्या भावना
पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्व परीक्षा रविवारी सुरुळीतपणे पार पडली. तब्बल वर्षभरानंतर झालेल्या या परीक्षेतील दुपारच्या सत्रातील “सी-सॅट’चा पेपर अवघड होता, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. परंतु करोनाचा प्रार्दुभाव कायम असतानाही “एमपीएससी’ची एकदाची परीक्षा झाली, असा नि:श्वास उमेदवारांनी सोडला.
उमेदवारांना परीक्षेपूर्वी सुमारे दीड तास आधी परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 3 ते 5 या कालावधीत उमेदवरांनी परीक्षा दिली. पहिला पेपर 100 प्रश्नांचा अन् 200 गुणांचा होता. तर दुसरा पेपर हा सी-सॅट 80 प्रश्नांचा अन् 200 गुणांचा होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रात प्रवेश देताना सॅनिटायझर व मास्क असे कीट उमेदवारांना देण्यात आले. प्रत्येकाची थर्मलद्वारे तपासणी केली जात होती. तसेच शारीरिक अंतर ठेवत बैठकव्यवस्थेचे नियोजन करण्यात आले होते.
नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा दि. 14 मार्च रोजी होणार होती. मात्र स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांनी पुण्यात तीव्र आंदोलन केले. त्याची दखल घेत राज्य सरकारने दि. 21 मार्च रोजी परीक्षा घेण्यात येणार असण्याची घोषणा केली. त्यानुसार ही परीक्षा झाली. नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा 5 एप्रिल 2020 रोजी होणार होती. परंतु करोनामुळे ही परीक्षा चारवेळा पुढे ढकलण्यात आली. आता परीक्षा उशिराने का होईना झाली, अशी प्रतिक्रिया उमेदवारांनी दिली.
प्रश्नांची काठीण्यपातळी जास्त
पहिला पेपर सर्रास उमेदवारांनी ठीक गेल्याचे सांगितले. पण “सी-सॅट’च्या प्रश्नपत्रिकांच्या पृष्ठांची संख्या 63 इतकी होती. परिच्छेदातील सर्व मजकूर वाचून उत्तरे लिहिण्यात बराच वेळ गेला. त्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तरे सोडविण्यास वेळ कमी पडत होता. सी-सॅटमधील बहुतांश प्रश्न वेळकाढूपणाचे अन् किचकट होते. परिणामी, हा पेपर टफ होता, अशीच प्रतिक्रिया परीक्षेतून बाहेर पडलेल्या उमेदवारांची होती.
राज्य सेवा पूर्व परीक्षा पारंपरिक पद्धतीने न होता थोड्या प्रमाणात पॅटर्न बदलला आहे. त्यामुळे प्रश्नांची उत्तरे योग्य पद्धतीने सोडवता आली नाहीत. सी-सॅटमधील काही प्रश्न विज्ञान शाखेच्या उमेदवारांना अनुकूल ठरणारी होती. पण, कला शाखेच्या उमेदवारांना ही परीक्षा तारेवरची कसरतच म्हणावी लागेल. आम्ही वर्षभर तयारी केली, पण पॅटर्नमध्ये किंचित बदल केल्याने परीक्षा अवघड गेली.
– संदेश बगले, एमपीएससी परीक्षा देणारा उमेदवार