रत्नागिरी – करोना आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवरून एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. यावर राज्य सरकार अद्यापही तोडगा काढण्यात अयशस्वी ठरले आहे. यामुळेच नैराश्यात असलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना लांजा तालुक्यातील कोर्ले गावात घडली आहे. यामुळे जिल्हयात एकच खळबळ उडाली आहे.
महेश झोरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महेश झोरे हा अत्यंत मेहनती मुलगा होता. आई-वडील आणि दोन भाऊ कामानिमित्त मुंबईला राहत होते. अभ्यास करण्यासाठी महेश कोर्ले गावाकडच्या घरी आला होता.
स्पर्धा परीक्षा पास होऊन मोठा अधिकारी बनायचे, असे महेशचे स्वप्न होते. एकटा राहणाऱ्या महेशला भेटण्यासाठी त्याचे आजोबा कोर्ले येथे नेहमी जात होते. गुरुवारी महेशचे आजोबा कोर्ले येथील घरी आले. त्यावेळी महेशने गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले.
या घटनेमुळे महेशच्या आजोबांना मोठा धक्का बसला. पण महेशने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहीली होती. यात एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने नैराश्यातून मी आत्महत्या करत असल्याचे या चिठ्ठीत त्याने नमूद केले आहे. याप्रकरणी लांजा पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.