पुणे – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट “ब’ संयुक्त पूर्व परीक्षा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा या तिन्हींचे सुधारित वेळापत्रक सोमवारी जाहीर केले. त्यानुसार आता या अनुक्रमे 11 ऑक्टोबर, 22 नोव्हेंबर आणि 1 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत एप्रिल/मे 2020 मध्ये आयोजित केलेल्या तीन परीक्षा करोना व लॉकडाऊन पार्श्वभूमीवर ऐनवेळी पुढे ढकलल्या. अचानक हा निर्णय घेतल्याने उमेदवारांमधून तीव्र नाराजी होती.
मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार परीक्षा पुढे ढकलल्याचे आयोगाने स्पष्ट केले होते. परंतु उमेदवारांनी केलेल्या संतप्त भावना विचारात घेता आयोगाला या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करावे लागले.