पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार पुढे ढकलण्यात येत असलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा अखेर 4 सप्टेंबरला होत आहे. त्यासाठी एमपीएससीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर दीड तास आधी पोहोचणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट “ब’ संयुक्त पूर्व परीक्षा होत आहे. करोनामुळे ही पूर्व परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या विषयावरून परीक्षा लांबणीवर पडली. त्यानंतर उमेदवारांनी आंदोलन केल्यावर एप्रिल महिन्यात परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता 4 सप्टेंबरला ही परीक्षा प्रत्यक्षात होत असल्याने अनेक महिन्यापासून प्रतिक्षेत असलेले उमेदवारांमध्ये उत्सुकता आहे.
उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी दीड तास परीक्षा केंद्रावर आणि प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या एक तास आधी परीक्षा कक्षातील बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी निश्चित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नसल्याचे आयोगाकडून पुन्हा एका स्पष्ट करण्यात आले आहे.