“एमपीएससी’कडून परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दिलासा

 

पुणे – करोना पार्श्‍वभूमीवर पुढे ढकललेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्य सेवा पूर्व परीक्षा येत्या 14 मार्च, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्च आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित “गट-ब’ संयुक्‍त पूर्व परीक्षा 11 एप्रिल रोजी होणार आहे.

यापूर्वी आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा 11 ऑक्‍टोबर 2020, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर 2020, तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित “गट-ब’ संयुक्‍त पूर्व परीक्षा 22 नोव्हेंबर रोजी होणार होती. सर्वत्र करोनाचे संकट असतानाही यापूर्वी आयोगाने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार तारखा जाहीर केल्या होत्या. मात्र विशेषत: स्पर्धा परीक्षा उमेदवारांऐवजी अन्य घटकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने या परीक्षा पुढे ढकलल्या. आता नव्याने परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, करोनासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल व याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, याकरिता आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकन करणे, उमेदवारांच्या हिताचे राहील, असे आयोगाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.