पुणे – मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) येत्या रविवारी (दि.11) होणारी परीक्षा अखेर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “एमपीएससी’ची परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात येत असल्याची शुक्रवारी घोषणा केली. ही परीक्षा कधी होणार आहे, याचा निर्णयही लवकरच घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाच्या अंतरिम स्थगितीनंतर “एमपीएससी’ची पूर्व परीक्षा येत्या रविवारी होणार होती. स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याने ही परीक्षा पुढे ढकलावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला होता.
त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात “एमपीएससी’ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. परीक्षा दोन दिवसांवर असताना ही परीक्षा होणार की नाही, अशा संभ्रमात असलेल्या उमेदवारांचा अखेर तिढा सुटला आहे. करोना पार्श्वभूमीवर ही परीक्षा दोनदा आणि मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे एकदा अशा तीनदा पुढे ढकलावी लागली आहे.