पुणे- एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेत सामान्य अध्ययन पेपर-2 म्हणजेच “सी-सॅट’ आता केवळ पात्रताफेरी गाठण्यासाठी मर्यादित करण्यात आला आहे. यासंदर्भात चंद्रकांत दळवी समितीच्या शिफारसीनुसार आयोगाने निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर सन 2013 मध्ये एमपीएससीकडून राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये सी-सॅट पेपर समाविष्ट करण्यात आला होता. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सी-सॅट केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरला जात असताना एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य होते. तसेच या पेपरचा अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थांना कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थांच्या तुलनेने मार्क मिळवण्यात फायदा होत असल्याचा आरोप इतर शाखेतील विद्यार्थांकडून केला जायचा. इतर विद्यार्थांवर भेदभाव होत असून सी-सॅट केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरला जावा, यासाठी सातत्याने मागणी होत होती. यावर अभ्यास करण्यासाठी “एमपीएससी’ने 2021 मध्ये दळवी समितीची स्थापना केली होती. तिच्या शिफारशींआधारे आयोगाने निर्णय घेतला असून सी-सॅट पेपरमध्ये आता विद्यार्थांना किमान 33 टक्के म्हणजेच 66 मार्क मिळवावे लागणार आहेत. परंतु, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी जाहीर करताना केवळ सामान्य अध्ययन पेपर-1 मधील गुणांचा विचार केला जाणार आहे.
उशिरा का होईना, पण आयोगाने उमेदवारांच्या हिताचा निर्णंय घेतला आहे. आम्ही मागील चार वर्षांपासून याचा पाठपुरावा करत होतो. पण आयोगाकडून केवळ आश्वसने दिली जायची. पण, आता या निर्णयामुळे यापुढे कोणत्याही शाखेच्या विद्यार्थांवर अन्याय होणार नाही.
किरण निंभोरे, एमपीएससी स्टुडन्ट राइट्स
एमपीएससीचे खूप खूप आभार त्यांनी विद्यार्थांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला. पण, आयोगाने 2022 मधील नियोजित वेळापत्राकानुसार नवीन जाहिराती काढाव्यात आणि लवकरात लवकर पेपर घ्यावेत.
– उद्धव उगले, स्पर्धा परीक्षा उमेदवार