मुंबई – राज्यात एमपीएससीशी संबंधित एकूण पंधरा हजार जागा रिक्त असून या जागा शक्य तितक्या लवकर भरल्या जातील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत बोलताना दिली.
ते म्हणाले की, या उमेदवारांच्या मुलाखती त्वरेने घेण्यासाठी आम्ही एमपीएससीच्या पॅनेलवरील सदस्यांची संख्या वाढवण्याचाही विचार करीत आहोत. सध्या या पॅनेलवर सहा सदस्य आहेत. ते 11 किंवा 13 करण्याचा प्रस्ताव आहे. पुण्यातील स्वप्निल लोणकर याच्या आत्महत्या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेतही उमटले.
त्यावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी ही माहिती दिली. एमपीएससीशी संबंधीत रिक्त जागा सन 2018 पासूनच्या आहेत. अशा एकूण 15 हजार 511 पोस्ट भरायच्या आहेत. त्या जागा त्वरित भरण्याच्या सूचना सरकारच्या सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत.
या जागांसह पोलीस आणि सार्वजनिक आरोग्य सेवांमधील रिक्त जागाही भरल्या जातील असे त्यांनी नमूद केले. एमपीएससीच्या पॅनेलवरील रिक्त जागाही 31 जुलैपर्यंत भरल्या जाणार आहेत. या पॅनेलच्या सदस्यांची संख्या 11 ते 13 ने वाढवण्याची प्रक्रिया सुरूही झाली आहे असे ते म्हणाले.