खासदारांनी विकासकामांबाबत बोलावे

प्रचाराला मंत्री, नेत्यांची फौज आणल्यावरून डॉ. कोल्हेंनी उडविली खिल्ली

राजगुरुनगर – शिरूर लोकसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला असून शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांना त्यांचा पराभव दिसत असल्यामुळेच शिवसेना व भाजपाचे मंत्री व नेते शिरुर लोकसभा मतदार संघात दाखल झाले आहेत. मतदानापूर्वीच आढळराव यांनी हार मानल्याचे यातून दिसते; मात्र आपण या सर्व मंत्री व नेत्यांचे स्वागत करतो. त्यांना आता कळेल की, त्यांचे 15 वर्षे खासदार राहिलेले आढळराव किती निष्क्रिय आहेत, अशी कोपरखळी मारत राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदार आढळराव यांची खिल्ली उडविली आहे.

खेड तालुक्‍यातील प्रचार दौऱ्यादरम्यान पत्रकारांनी त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी मंत्री व नेत्याची फौज येत असल्याबाबत विचारले असता त्यांनी आढळराव सध्या मनातून पराभत झालेत. मनातून हारलेले रणांगणात जिंकत नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी मंत्री व नेते आले तरी त्याचा काहीच फरक पडणार नाही. त्याचे कारण म्हणजे, येथील जनतेने मनातून आता ठरवले आहे की, यंदा बारी पलटी करायची म्हणजे करायची. त्यामुळेच विरोधी उमेदवार बिथरलेत. शिरुर लोकसभेच्या प्रचारादरम्यान पिछाडीवर पडलेल्या आढळराव यांनी विकासकामांवर न बोलता वैयक्तिक टीका केली. खरे तर, यामुळे मतदारसंघाचे प्रश्‍न सुटणार नाहीत हे सुज्ञ मतदारांना समजते. त्यामुळे मनातून हारलेल्या शिवसेनेच्या आढळरावांनी आता उसने अवसान आणत प्रचाराला धार आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्याचा उपयोग होणार नाही. आढळराव 15 वर्षे खासदार राहिलेत.

पंधरा वर्षांचा कालखंड म्हणजे खूप मोठा आहे. त्यांच्या निष्क्रियतेमुळे मतदार संघातल्या हजारो युवकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. शेतकरी हवालदिल झाला आहे. पाण्याचे नियोजन नाही. मतदार संघातल्या छोट्या मोठ्या शहरांचे नियोजन नाही. मतदारसंघात विविध साधनसंपत्ती आहे; परंतु त्यानुसार त्याचा विकास करण्याचे काम झाले नसल्याने वर्षानुवर्षे संबंधित लोक गरीबीतच जगत आले. खासदारांची ही निष्क्रियता त्यांच्या वैयक्तिक बाबतीत दिसली नाही. त्यांनी स्वतःचा मात्र विकास केला. सर्वसामान्य मतदारराजाला तुम्ही फार काळ अंधारात ठेवू शकत नाही. जनता सुज्ञ आहे आणि जनतेने यावेळी परिवर्तनाचा निर्णय केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.