खासदारांनी रडीचा डाव खेळू नये – डॉ. अमोल कोल्हे

पाबळ- गत लोकसभा निवडणूक झाल्यानंतर गायब झालेले खासदार आता मताचा जोगवा मागण्यासाठी मतदारांकडे येत आहेत. विकास कामे झाली नसल्याबद्दल ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्‍नांना खासदारांनी प्रामाणिकपणे उत्तरे द्यावी. त्यांनी रडीचा डाव खेळू नये. 15 वर्षांत एकही भरीव आणि ठळक काम न करता भावनिक करून मतदारांना उल्लु बनविण्यात खासदार माहीर असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

शिरूर लोकसभा मतदार संघाच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील पाबळ येथील आयोजित विराट सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्रपक्षाचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी मतदारांना मार्गदर्शन केले.

पाबळ: येथे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी मतदारांची झालेली प्रचंड गर्दी

याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील, मंगलदास बांदल, माजी आमदार काकासाहेब पलांडे, प्रकाश पवार, देवदत्त निकम, मानसिंग पाचुंदकर, रेखाताई बांदल, स्वातीताई पाचुंदकर, सविता बगाटे, दौलत पऱ्हाड आदी उपस्थित होते. विमानतळ दुसरीकडे गेले, पुणे-नाशिक हमरस्त्याची कामे रखडली, पुणे-नाशिक रेल्वे नाही, बेरोजगारांना रोजगार नाही, बैलगाडा शर्यत सुरु नाही. इत्यादी असंख्य प्रश्‍न प्रलंबित ठेवून आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी भावनिक मुद्दे करून खासदार निवडणुका जिंकत आहेत; परंतु यावेळी मतदारच त्यांना कात्रजचा घाट दाखवतील. गत खासदारकीच्या निवडणुकीनंतर बेपत्ता झालेले खासदार आता मतांसाठी फिरत आहे. त्यांना तुम्ही कोठे होता, विकासकामांसाठी आमच्या गावाला दमडी दिली नाही, असे थेट प्रश्‍न विचारले जात आहेत. खासदार मात्र ग्रामस्थांच्या प्रश्‍नांना बगल देऊन केविलवाना चेहरा करून भावनिक वातावरण करतात; परंतु आता मतदारांनी खासदारांचा खोटेपणाचा बुरखा पाडून त्यांना त्यांची जागा दाखविण्याचा चंग बांधला आहे. पुणे-नाशिक रेल्वे मार्गावरील 40 गावे वगळण्यात आल्याने या गावांचा विकास खुंटला. हा करंटेपणा खासदारांनी का केला? असा थेट प्रश्‍न राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदार आढळराव पाटील यांना विचारला आहे.

सत्ताधाऱ्यांना युवकच खाली खेचतील – वळसे पाटील
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली. विकासावर बोलण्याऐवजी जातीधर्म यावर बोलून मंदिर व मस्जिदवरुन समाजात फूट पाडण्याचे काम भाजप-शिवसेना सरकार करते. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी होरपळत असताना सरकार मात्र हलायला तयार नाही. शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नसलेल्या सरकारला हटविण्याची वेळ आता आली आहे. बेरोजगारीचा प्रश्‍न प्रचंड असताना त्याबाबत बोलायला सत्ताधारी तयार नाहीत. त्यामुळे युवकांमध्ये सरकारबाबत चीड निर्माण झाली आहे. सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्याचे काम युवकच करतील. असा विश्‍वास विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

  • शिवसेनेला खिंडार!
    पाबळ ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. विकासाची धमक फक्त विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यातच आहे. येथे येड्या गबाळ्याचे काम नाही. असे युवकांनी आपल्या भाषणात सांगितले. तसेच पाबळ ग्रामपंचायतीचे शिवसेनेचे सदस्य मारुती बगाटे, भाऊसाहेब गावडे, शकुंतला कोल्हे, मानसिंग नर्‌हे, शिवसेना नेते रविंद्र चौधरी आदींनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला खिंडार पडले आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाबळमधील सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.