देशातल्या पाणी टंचाई विषयी खासदारांनी केली राज्यसभेत ओरड

सरकारला केले मुलभूत उपाययोजना करण्याचे आवाहन

नवी दिल्ली – देशाच्या अनेक भागात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून त्यावर सरकारने काही गंभीर उपायोजना तातडीने केली पाहिजे अशी मागणी विविध पक्षांच्या सदस्यांनी आज राज्यसभेत केली. नदी जोड प्रकल्प त्वरीत राबवणे, जमीनीखाली खोल गेलेल्या पाण्याचे पुर्नरभरण करणे अशा उपायांना सरकारने आता प्राधान्य देण्याची गरज आहे असे या सदस्यांनी सुचवले.

भाजपचेच सत्यनारायण जतीय यांनी मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पाणी टंचाईचा विषय उपस्थित केला. ते म्हणाले की दरवर्षीच ही समस्या भेडसावणार असेल तर त्यावर आता कायम स्वरूपी उपाय योजना केली पाहिजे.भाजपचे दुसरे सदस्य अशोक वाजपेयी म्हणाले की निती आयोगाच्या अहवालात पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे त्याचीही सरकारने गंभीर दखल घेतली पाहिजे. समाजवादी पक्षाच्या रेवती रमणसिंह म्हणाल्या की लोकांचे पाणी टंचाईमुळे जीवघेणे हाल होत असून सरकारने त्वरीत जागे होण्याची गरज आहे. सरोज पांडे यांनी रेनवॉटर हार्वेस्टींग साठी जनजागृती करण्याचे आवाहन केले.

या विषयावर सभागृहात स्वतंत्र चर्चा होण्याची गरजही अनेक सदस्यांनी व्यक्‍त केली. त्यावर अध्यक्ष व्यंकैय्या नायडू म्हणाले की हा खरेच गंभीर विषय असून सदस्यांनी स्वतंत्र अल्पकालीन चर्चेचा प्रस्ताव दिला तर आपण त्यासाठी अनुमती देण्यास तयार आहोत. यावर बोलताना कॉंग्रेसचे टी सुब्बारामी रेड्डी म्हणाले की देशातील वाढती लोकसंख्या हाही एक गंभीर विषय बनत चालला असून आपण आता चीनलाही लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकणार आहोत. त्यामुळे सरकारने कुटुंब नियोजनाला प्राधान्य आणि काही विशेष सवलती देण्याचा विचार केला पाहिजे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.