एमपीएफ बॉक्‍स क्रिकेट लीग : एएमए ग्लॅडिएटर्स, श्रीकृष्णा पर्ल्स संघांची आगेकूच

पुणे – महेश प्रोफेशन फोरम (एमपीएफ) यांच्या तर्फे आयोजित “एमपीएफ बॉक्‍स क्रिकेट लीग’ स्पर्धेत एएमए ग्लॅडिएटर्स, श्रीकृष्णा पर्ल्स,एक्‍सपर्टस्‌ रॉयल्स्‌, महाराठी सातोना आणि ग्रीन व्हिक्‍टर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला.

कोद्रे फार्मस्‌, सिंहगड रोड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत रोहीत सोमाणी याच्या खेळीच्या जोरावर एएमए ग्लॅडिएटर्स संघाने करवॉंज्‌ रायझिंग स्टार संघाचा 6 धावांनी पराभव केला. निखील पलोड याच्या 21 धावांच्या जोरावर श्रीकृष्णा पर्ल्स संघाने सेंट्रल एनर्जी मार्केटर्स संघाचा 11 धावांनी पराभव केला.

अभिजीत सिकची याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर एक्‍सर्टस्‌ रॉयल्स्‌ संघाने मिरॅकल चेसर्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला. पवन कासटच्या 32 धावांच्या जोरावर महाराठी सातोना संघाने एक्‍सपर्टस्‌ रॉयल्स्‌ संघाचा 4 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली. नरेश गांधी याच्या 32 धावांच्या जोरावर ग्रीन व्हिक्‍टर्स संघाने महाराठी सातोना संघाचा 44 धावांनी सहज पराभव केला. ग्रीन व्हिक्‍टर्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना नरेश गांधी (32 धावा) व पुनित बाहेटी (28 धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर 7 षटकात 5 गडी गमावून 97 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना महाराठी सातोना संघाचा डाव 7 षटकात 53 धावांवर संपुष्टात आला.

स्पर्धेचे उद्घाटन आयजीपी डॉ.विठ्ठल जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योजक जुगलकिशोर तापडिया, सुशील करवा, एमपीएफ सेंट्रलचे अध्यक्ष नवनीत मानधनी, सचिव भरत लढे, ओम भट्टड आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचा सूत्रसंचालन मोनिका राठी व पूनम कासट यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.