एमपीएफ बॉक्‍स क्रिकेट लीग स्पर्धा : स्टेटस स्पार्टन्स्‌, व्हेलॉसिटी वॉरीयर्स संघांना विजेतेपद !

पुणे – स्टेटस स्पार्टन्स्‌ संघाने पुरूषांच्या गटाचे तर, व्हेलॉसिटी वॉरीयर्स संघाने येथे पार पडलेल्या महेश प्रोफेशन फोरम (एमपीएफ) यांच्या तर्फे आयोजित “एमपीएफ बॉक्‍स क्रिकेट लीग’ स्पर्धेत महिलांच्या गटाचे विजेतेपद संपादन केले.

कोद्रे फार्मस्‌, सिंहगड रोड येथे झालेल्या या स्पर्धेच्या पुरूषांच्या अंतिम सामन्यात आशिष बिहनी याच्या कामगिरीच्या जोरावर स्टेटस स्पार्टन्स्‌ संघाने श्रीकृष्णा पर्ल्स संघाचा 8 गडी आणि 2 षटके राखून सहज पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीकृष्णा पर्ल्स संघाने 7 षटकात 10 गडी गमावून 55 धावा केल्या. श्रीकृष्णा संघाकडून गोपाल जाजू याने 8 चेंडूत 2 षटकारांसह 27 धावा केल्या. इतर कोणताही खेळाडू संघाकडून दुहेरी आकडा पार करू शकला नाही.

स्टेटस संघाच्या जयेश कासट (2-4), सचिन दरक (2-4) आणि मयुर मुंदडा (2-35) यांनी अचूक आणि चमकदार गोलंदाजी केली. स्टेटस स्पार्टन्स्‌ संघाने हे आव्हान 5 षटकात व 2 गडी गमावून पूर्ण केले. आशिष बिहानी याने 21 चेंडूत 1 चौकार व 1 षटकारासह 33 धावा केल्या व संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. महिला गटाच्या अंतिम सामन्यात आरती कारवॉंच्या कामगिरीच्या जोरावर व्हेलॉसिटी वॉरीयर्स संघाने गेनसोल सुपर क्वीन्स्‌ संघाचा 45 धावांनी सहज पराभव करून विजेतेपद मिळवले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण शेखर मुंदडा आणि विजय भट्टड यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या संघाला आणि उपविजेत्या संघाला करंडक देण्यात आला. या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली. सर्वोत्कृष्ट फलंदाज कोमल मंत्री, सर्वोत्कृष्ट गोलंदाज परीक्षित दरक, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक रमेश तोष्णिवाल, उदयोन्मुख खेळाडू नरेश गांधी अशी पारितोषिके पुरूष गटात देण्यात आली.

सर्वोत्कृष्ट फलंदाज पायल बिहानी, सर्वोत्कृष्ट गोलंदाज श्रध्दा सारडा, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक मधुश्री झंवर आणि स्पर्धेची सर्वोत्कृष्ट खेळाडू केसर कोगटा अशी पारितोषिके महिला गटात देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.