एमपीएफ बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धा
पुणे – सन सुपर किंग्ज्, केप्र मसालेदार व बीएमसी फायटर्स संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून येथे होत असलेल्या महेश प्रोफेशन फोरम (एमपीएफ) यांच्या तर्फे आयोजित एमपीएफ बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला.
राजयोग लॉन्स्, मार्केटयार्ड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत संदीप काब्राच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर सन सुपर किंग्ज् संघाने कॉन्ट्रोक्राफ्ट स्मशर्स संघाचा 3 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. दुसऱ्या सामन्यात संदीप काब्राच्या 45 धावांच्या जोरावर सन सुपर किंग्ज् संघाने ओम सिस्टीम्स् संघाचा 74 धावांनी सहज पराभव करत सलग विजय मिळवला.
केप्र मसालेदार संघानेही उद्घाटनाच्या दिवशी सलग दोन विजय मिळवण्याची कामगिरी केली. पहिल्या सामन्यात अमोल पल्लोडच्या खेळीच्या जोरावर केप्र मसालेदार संघाने विद्युत चॅलेंजर्स संघाचा 17 धावांनी पराभव केला. दुसर्या सामन्यात केप्र मसालेदार संघाच्या प्रथमेश मालपाणीच्या अष्टपैलू खेळीमुळे संघाने व्होगलाईन वॉरीयर्स संघाचा 8 गडी राखून सहज पराभव केला.