“एमपीसीबी’ करणार कठोर कारवाई

पवना नदीतील मासे-कासव मृत्यू प्रकरणी

पिंपरी – पवना नदीपात्रात प्रदुषणामुळे अनेक मासे आणि कासव मृत झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) केलेल्या पाहणीत संबंधित ठिकाणी पाण्याला उग्र वास येत असल्याचे आढळले. तसेच, पाण्याचा पी.एच. (सामु) सरासरी 6 ते 7 इतका आढळला आहे. पाण्याचा आणि मृत माशांचा नमुना प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविलेला आहे. त्याचा अहवाल येण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागणार आहे. तथापि, याबाबत “एमपीसीबी’तर्फे कठोर कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

बुधवारी (दि. 4) रात्री पवना नदीपात्रात मृत मासे व एका कासवाचा मृत्यू झाल्याचेही निदर्शनास आले. त्यानंतर संबंधितांनी गुरुवारी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. या पाहणीत पवना नदीवरील केजुदेवी बंधारा येथील नदीच्या पाण्याचा नमुना घेण्यात आला. पाण्याचा रंग हिरवट होता. तसेच, पाण्याला उग्र वास येत होता. ताथवडे येथेही पाण्याला उग्र वास येत होता. केजुदेवी बंधाऱ्यापासून वाल्हेकरवाडी विसर्जन घाटापर्यंत बोटीद्वारे पाहणी करण्यात आली.

“एमपीसीबी’ करणार कठोर कारवाई
त्या वेळी पवना नदीत मिसळणाऱ्या चार नाल्यांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. सपकाळ वस्ती नाला, बालाजी लॉ कॉलेज शेजारील नाला, रागा हॉटेलशेजारील नाला (ताथवडे), वाल्हेकरवाडी नाला आदी नाल्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या सर्व ठिकाणी पाण्याला उग्र वास येत होता. पाण्याचा रंग पांढरट पिवळसर होता. रागा हॉटेलशेजारील नाला वगळता अन्य नाल्यांतील तसेच केजुदेवी बंधारा आणि ताथवडे स्मशानभूमीजवळील पाण्याचा पीएच 6-7 इतका होता. तर, रागा हॉटेलशेजारील नाल्यातील पाण्याचा पीएच 7-8 इतका आढळला आहे.

“एमपीसीबी’वर महापौरांकडून ताशेरे
पवना नदीपात्रात मासे व कासवाच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी महापौर उषा ढोरे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी याबाबत आज “एमपीसीबी’ला पत्र पाठविले. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पवनेतील प्रदुषणामुळे जल जीवसृष्टी धोक्‍यात आली आहे. त्याला एमपीसीबीचे अक्षम्य दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. याबाबत आपणास यापूर्वी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. पवनेचे वारंवार होणारे प्रदूषण ही अत्यंत गंभीर बाब आहे. याबाबत “एमपीसीबी’ने तत्काळ उचित कार्यवाही करावी.

रावेतपासून केजुदेवी बंधारादरम्यान कोणत्याही प्रकारचा रासायनिक उद्योग नाही. येथील चार नाल्यांतून थेट नदीत मिसळणाऱ्या पाण्यावर मैलाशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया होणे आवश्‍यक आहे. यापूर्वीही पवना नदीपात्रात मृत मासे आढळले होते. त्या वेळी प्राप्त अहवालानुसार त्या पाण्यात रसायन आढळले नव्हते. आत्ताही एमपीसीबीकडून पाण्याचा आणि माशाचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला आहे. आठवडाभरात हा अहवाल येईल. दरम्यान, याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे नियोजन आहे.

– किरण हसबनीस, उपप्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)